एशियन फिल्म फाऊण्डेशनतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सव ७ डिसेंबरपासून रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथील मिनी थिएटरमध्ये आयोजित करण्यात येत असून यंदाच्या महोत्सवात गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनुमती’ या चित्रपटासह धनंजय कुलकर्णी दिग्दर्शित ‘सांजपर्व’ आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘अजिंक्य’ असे तीन मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
७ ते १३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते केले जाणार आहे. दक्षिण कोरियाचे पुरस्कारविजेते दिग्दर्शक कीम की डय़ूक यांचा ‘पिएटा’ हा यंदाचा उद्घाटनाचा चित्रपट आहे. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा या चित्रपटाने ‘गोल्डर लायन’ हा पुरस्कार मिळविला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रतिनिधी नोंदणी करता येणार आहे. रवींद्र नाटय़ मंदिर संकुलातील तळ मजल्यावरील कार्यालयात सकाळी ११ वाजल्यापासून प्रतिनिधी नोंदणी सुरू केली जाणार आहे.
‘थर्ड आय’चे यंदाचे अकरावे वर्ष असून महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १३ डिसेंबरला अभिनेत्री स्मिता पाटील यांचा २५ वा स्मृतिदिन आहे. म्हणूनच ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यानिमित्त स्मिता पाटीलच्या आठवणी, अभिनय शैली याविषयी सांगून श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्यानंतर स्मिता पाटीलच्या अभिनयाने गाजलेला ‘भूमिका’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांचा ‘चिमणी पाखरं’ हा चित्रपट दाखविण्यात येणार असून ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी त्यांच्या आठवणी जागविणार आहेत.  तैवानी चित्रपटांच्या विशेष विभागाबरोबरच जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांनी दिग्दर्शित केलेले त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील चित्रपट हेही यंदाच्या ‘थर्ड आय’ चित्रपट महोत्सवाचे वैशिष्टय़ ठरणार आहे.