चेंबरच नसल्याने पर्जन्य जलवाहिनीची सफाई रखडली; रेल्वे मार्ग पाण्याखाली जाण्याची भीती
परळ ते एल्फिन्स्टन दरम्यान रेल्वे मार्गादरम्यान असलेल्या पर्जन्य जलवाहिनीवर चेंबरच नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्याची साफसफाई होऊ शकलेली नाही. या संदर्भात पालिकेने सातत्याने पाठपुरावा करुनही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात परळ आणि एल्फिन्स्टन रेल्वे मार्गालगतचा परिसर पाण्याखाली जाण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील परळ आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गात पावसाचे पाणी साचू नये यासाठी काही वर्षांपूर्वी तेथे ७५० मि.मी. व्यासाची आणि ३०० मीटर लांबीची पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे मार्ग आणि आसपासच्या परिसरातील सखलभागात पाणी साचणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. काही अंशी तो खराही ठरला.
या पर्जन्य जलवाहिनीवर एकही चेंबर बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या पर्जन्य जलवाहिनीची साफसफाई करता आलेली नाही. पावसाळ्यात पाण्यासोबत कचराही वाहात पर्जन्य जलवाहिनीत जातो आणि अडकून बसतो. त्यामुळे ती तुंबते आणि त्याचा फटका आसपासच्या परिसरातील नागरिकांना सोसावा लागतो. तसेच रेल्वे मार्ग पाण्याखाली जाऊन रेल्वे सेवेवरही त्याचा परिणाम होतो. ही बाब लक्षात आल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. पर्जन्य जलवाहिनीवर चेंबर बांधण्यात यावे यासाठी गेले वर्षभर रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. तसेच पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र रेल्वे प्रशासनाकडून त्याची गांभीर्याने दखलच घेण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी या पर्जन्य जलवाहिनीमध्ये काथ्या अडकला होता. त्यामुळे आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी साचून रहिवाशांना त्रास सहन करावा लागला होता. यंदाही मुसळधार पाऊस कोसळताच परळ-एल्फिन्स्टन दरम्यानचे रेल्वे मार्ग आणि आसपासचा परिसर पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.