दहा वर्षांनंतरही तीन उदंचन केंद्रांचे काम अपूर्णच
पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नालेसफाईवर भर दिला जात असला तरी लालफितीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे मुंबईतील दहापैकी तीन उदंचन केंद्र दहा वर्षांनंतरही सुरू होऊ शकलेली नाहीत. जुहू येथील गझधरबंदच्या कामाची सुरुवात दोन वर्षांपूर्वी झाली असली तरी ते कार्यरत होण्यासाठी आणखी एक वर्ष लागणार आहे तर अंधेरी व चेंबूर येथील केंद्राची जमीन ताब्यात घेणेही पालिकेला जमलेले नाही. ब्रिटानिका उदंचन केंद्र जूनमध्ये सुरू होणार असले तरी या केंद्राकडे येणाऱ्या वाहिन्या अरुंद असल्याने त्याच्या कार्यक्षमतेबाबतही शंका व्यक्त करण्यात येत आहे.
जुलै २००५ मध्ये आलेल्या पुरानंतर शहरातील सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पूर्व व पश्चिम किनारपट्टीवर आठ ठिकाणी जलउदंचन केंद्र बांधण्याचे निश्चित करण्यात आले. भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्याची पातळी चार ते पाच मीटपर्यंत वाढते. त्याच वेळी मुसळधार पाऊस पडल्यास शहरातील पाणी समुद्रात जाण्याऐवजी समुद्रातील पाणीच नाल्यामुखावाटे शहरात घुसते व सखल भागात पाणी साठते. ही स्थिती टाळण्यासाठी भरती वेळी नाल्यांचे मुख बंद करून हे पाणी वर खेचून उदंचन केंद्रावाटे समुद्रात सोडले जाते. यामुळे सखल भागात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होते. कागदावर यशस्वी दिसणारी ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी मात्र पालिकेला दहा वर्षेही कमी पडली आहेत. दहापैकी इर्ला व हाजी अली ही दोन केंद्र सुरू होण्यासाठी चार वर्षे लागली. पहिल्या टप्प्यातील लव्हग्रोव्ह व क्लीव्हलॅण्ड ही केंद्र अखेर २०१५ मध्ये पूर्ण झाली. मात्र गेल्या वर्षी पहिल्याच पावसात क्वीव्हलॅण्ड केंद्राजवळील नाल्यात मोठे दगड अडकल्याने समुद्रमुखाचे दार बंद करता आले नाही आणि दादर, एल्फिन्स्टन परिसरात पाणी तुंबले.
दुसऱ्या टप्प्यातील ब्रिटानिया व गझधरबंद या केंद्रांचे २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठय़ा दिमाखात उद्घाटन करण्यात आले. यापैकी ब्रिटानिया उदंचन केंद्र जूनमध्ये सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत तर गझधरबंद हे केंद्र डिसेंबर २०१६ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे, म्हणजेच यंदाच्या पावसाळय़ात या केंद्राचा उपयोग होणार नाही. माहुल आणि अंधेरीतील मोगरा या केंद्रांना मात्र पुढील अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. या दोन्ही केंद्रांसाठी पालिकेला जागाही ताब्यात घेता आलेली नाही.
चेंबूर येथील माहुल केंद्र मिठागराच्या जागेवर येत असल्याने त्यासाठी नगरविकास खात्याकडून परवानगी आणण्यास मीठ आयुक्तालयाने सांगितले आहे. या संदर्भात पालिका आयुक्तांनी नगरविकास खात्याकडे परवानगीसाठी पत्र पाठवले आहे, अशी माहिती पालिकेचे विशेष अभियांत्रिकी व प्रकल्प संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी दिली. अंधेरी येथील मोगरा नाला केंद्राच्या जमिनीबाबत दोन मालकांमध्ये न्यायालयात वाद सुरू आहे. याबाबत पालिकेनेही न्यायालयात या संदर्भात दाद मागितली आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या दोन्ही केंद्रांचे भविष्य अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले आहे.

आवाहन
पावसाळय़ात तुमच्या विभागात जमणारे पाणी किंवा रस्त्यावरील खड्डे तसेच उद्भवणाऱ्या इतर स्थानिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकसत्ता मुंबई’ व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. यासाठी तुमच्या विभागातील समस्यांचे छायाचित्र आणि सविस्तर तपशील mumbailoksatta@gmail.com या ईमेलवर पाठवा.