१६ ते १८ डिसेंबरदरम्यान आयआयटीच्या प्रांगणात तंत्रजत्रा

मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) टेकफेस्ट या विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सवात यंदा रोबोवॉर, सिम्युलेटर्सच्या तंत्रज्ञानातील अवाक करणाऱ्या करामतींबरोबरच वॉटर ड्रम, इलेक्ट्रो साऊंड फ्लो, डान्स फ्लोर मेलोडीजसारख्या गमतीजमती अनुभवता येणार आहेत.

‘टेकफेस्ट’चे आयोजन या वर्षी १६ ते १८ डिसेंबरदरम्यान करण्यात आले आहे. आशियातील सर्वात मोठा तंत्रमहोत्सव म्हणून ओळख असलेल्या ‘टेकफेस्ट’मध्ये यंदा सुमारे अडीच हजार महाविद्यालये सहभागी होण्याची शक्यता आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘टेकफेस्ट’मध्ये प्रगत आणि अत्याधुनिक नाइट शो अर्थात ‘टेक्नोहॉलिक्स’, गमतीजमतींचा कार्यक्रम म्हणून ‘ओझोन’, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची करामत असलेले ‘रोबोवॉर्स’चे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील कलाकारांचे विविध आविष्कारही या वेळी पाहायला मिळणार आहेत.

‘टेक्नोहॉलेिस’मध्ये देशी-विदेशी कलाकारांचे कार्यक्रम होतील. विदेशी कलाकारांमध्ये ऑस्ट्रियाचे ‘सोनिक सनारीज’ हा डीजे हजेरी लावणार आहे. हा डीजे संगीत आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रित सादरीकरणातून दर्शकांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, असा दावा आयोजकांनी केला आहे. सोबतच इलेक्ट्रोसाऊंड फ्लो, अविस्मरणीय डान्स फ्लोर मेलोडीज यांची अस्सल मेजवानी सोनिक सनारीज सादर करतील. या शिवाय ‘लाइट बॅलन्स युक्रेन’ या ‘युक्रेन गॉट टॅलेन्ट’ स्पध्रेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या स्पर्धकांचे सादरीकरण पाहण्यासारखे असेल. संगणक नियंत्रित एलईडीद्वारे ते दर्शकांसाठी एक वेगळीच मेजवानी घेऊन आले आहेत.

या शिवाय ‘वॉटर ड्रम सिंगापूर’ हे वॉटर ड्रम, रोिलग ड्रम, एलईडी ड्रम यावर आधारित नृत्य असे मनोरंजनाचे एक पॅकेज दर्शकांसाठी असेल. डंकिंग डेविल ही जगातील ३५ देशांत ९०० कार्यक्रम करणारी बास्केटबॉल टीम भारतात प्रथमच ‘टेक्नोहॉलिक्स’च्या माध्यमातून कार्यक्रम करणार आहेत. ‘ओझोन’मध्ये ‘९डी व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी’, ‘गेिमग झोन’, ‘पेन्टबॉल’, ‘बीएमएक्स बाईक्स’ आदींमध्ये थरार अनुभवता येईल. अर्थात टेकफेस्टचे मूळ आकर्षण यंदाही ‘रोबोवॉर’मध्ये असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज रोबोटमधील लढाई अनुभवण्याचा आनंद याही वर्षी काही औरच असेल. यातील विजेत्यास सव्वा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. पवईच्या आयआयटी संकुलात होणाऱ्या महोत्सवात मोफत प्रवेश असणार आहे.