मालाडमधील घटनेमुळे खळबळ; दहावीतील मुलांचे कृत्य

अभ्यासाच्या नावाखाली घरी बोलावून नववीतील एका विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांनी या लैंगिक अत्याचारांचे चित्रीकरण करण्याची घटना मालाडमध्ये उघडकीस आली आहे. या मुलांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ही चित्रफीत पसरवल्यानंतर ती या मुलीच्या काकूच्याच नजरेस पडली आणि या अन्यायाला वाचा फुटली. अखेर मालाड पोलिसांनी या मुलांना अटक करून त्यांच्याविरोधात अत्याचार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
मालाड पश्चिम येथे दोन दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर एक चित्रफीत पसरवण्यात आली होती. या चित्रफितीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तीन मुले लैंगिक अत्याचार आणि अश्लील चाळे करत असल्याचे दिसत होते. ही चित्रफीत या मुलीच्या काकूच्या निदर्शनास पडली आणि तिला धक्का बसला. तिने हे प्रकरण त्या मुलीच्या पालकांच्या कानावर घातल्यानंतर या अन्यायाला वाचा फुटली. मुलीच्या पालकांनी मालाड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी मुलीची चौकशी केली आणि त्यातून हे प्रकरण उघडकीस आले.
नववीत शिकणाऱ्या या मुलीला तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने ८ नोव्हेंबर रोजी अभ्यासासाठी स्वत:च्या घरी बोलावले होते. तेथे नववी आणि दहावीत शिकणाऱ्या इतर तीन विद्यार्थ्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि अश्लील चाळे करत त्याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले. या प्रकरणाची वाच्यता बाहेर केल्यास ही चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरवण्याची धमकीही त्यांनी तिला दिली. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने झालेल्या प्रकाराची माहिती कोणाला दिली नाही. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर खरा प्रकार लक्षात आला.
या विद्यार्थिनीच्या जबाबावरून मालाड पोलिसांनी या चार अल्पवयीन मुलांविरोधात सामूहिक अत्याचार, पोस्को आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या चौघांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.