विनातिकीट प्रवासी, दलाल, फेरीवाल्यांवर कारवाई

रेल्वेच्या कायद्यातील विविध कलमांचा भंग करणाऱ्या प्रवाशांविरोधात, तसेच फेरीवाल्यांविरोधात पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने २०१६ या वर्षांत केलेल्या कारवाईतून तब्बल तीन कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यात पश्चिम रेल्वेमार्गावरील बेकायदेशीर फेरीवाल्यांकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम ६१ लाखांच्या आसपास आहे. त्याशिवाय आरक्षित डब्यांमध्ये अधिकृत तिकिटाविना प्रवास, महिलांच्या डब्यात घुसखोरी, तिकीट दलाल यांविरोधातही ही कारवाई करून एकूण २.९८ कोटी रुपयांचा दंड गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलाने वसूल केला.

उपनगरीय लोकल गाडय़ांमध्ये किंवा रेल्वे स्थानक, पादचारी पूल यांवर तात्पुरते बस्तान मांडून विविध वस्तू विकणारे फेरीवाले प्रवाशांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरतात. अनेकदा या फेरीवाल्यांकडून प्रवाशांना धमकावण्याच्याही घटना घडतात. त्यांना आवर घालण्यासाठी गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने धडाकेबाज कारवाई केली होती. २०१६ या वर्षांत १३ हजारांहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई करत रेल्वे सुरक्षा दलाने तब्बल ६१.७ लाख रुपयांचा दंड वसूल केला.

फेरीवाल्यांवरील कारवाईशिवाय रेल्वे सुरक्षा दलाने चर्चगेट ते डहाणू यांदरम्यान तब्बल ६२४ तिकीट दलालांवर कारवाई करून त्यांच्याकडून १.३५ लाख रुपयांचा दंड वसूल केला. लोकल गाडय़ांमध्ये विनापरवाना जाहिराती चिकटवणे, अन्य प्रवाशांना उपद्रव पोहोचवणे अशा विविध गुन्ह्य़ांपोटी सहा हजार जणांवर कारवाई करत १६ लाख रुपयांचा दंड वसूल केला.

तसेच महिलांसाठी किंवा अपंगांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यांविरोधातही रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई केली जाते. २०१६मध्ये अशा ३३ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करत रेल्वे सुरक्षा दलाने ७१ लाखांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली.

दोन स्थानकांमध्ये किंवा एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम रेल्वे सुरक्षा दलाने हाती घेतली होती. त्यासाठी दोन स्थानकांमध्ये संवेदनशील ठिकाणी काही जवान तैनात करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात रूळ ओलांडणाऱ्या सुमारे १३ हजार व्यक्तींकडून ४६ लाख रुपयांच्या वर दंड वसूल करण्यात आला आहे.

untitled-30