मुंबई व आसपासच्या परिसरांत मागील तीन महिन्यांत एकाच पद्धतीने हातोडय़ाचे घाव घालून तीन हत्या झाल्याचे उघड झाले आहे. हत्या झालेले तिघेही पिठाची गिरणी चालवणारे होते. या तिन्ही हत्यांचा सूत्रधार एकच असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या अनुषंगानेच त्यांचा तपास सुरू आहे.
गेल्या शनिवारी, २४ नोव्हेंबर रोजी दहिसर येथे श्रीकृष्ण पीठाची गिरणी चालवणारे फुलचंद यादव (५०) यांची हत्या झाली होती. त्यांच्या डोक्यावर हातोडय़ाने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. क्षुल्लक वादातून ही हत्या झाली असावी, असे समजून पोलिसांनी या प्रकरणी एका भाजी विक्रेत्यास ताब्यात घेतले होते; परंतु नंतर त्याला सोडून दिले. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मुंब्रा आणि कल्याण येथेही अशाच पद्धतीने आणि पिठाची गिरणी चालवणाऱ्यांचीच हत्या झाल्याचे समजले. २८ सप्टेंबरला कल्याणच्या काळाचौकी परिसरात पिठाची गिरणी चालविणाऱ्या राजकुमार जैस्वाल (३८) याची हत्या करण्यात आली होती, तर ४ ऑक्टोबरला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रथिक फ्लोअर मिलच्या देवीलाल रामलखन जैस्वाल (३२) याची हत्या करण्यात आली होती.
या तिन्ही हत्या हातोडय़ानेच करण्यात आल्या होत्या. दहिसरचे पोलीस उपायुक्त सुनील देशमुख यांनी सांगितले की, या तिन्ही हत्या या पीठ गिरणी चालविणाऱ्यांच्याच असून तिन्ही हत्या हातोडय़ानेच झाल्या आहेत. त्यांच्यात सामायिक दुवे आहेत. या हत्या करणारी कुणी एकच व्यक्ती आहे का, हत्या झालेल्या तिघांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, त्याचा आम्ही तपास करत आहोत. तिन्ही प्रकरणांत पोलिसांना हातोडा घटनास्थळी सापडला आहे. तिन्ही प्रकरणांत हातोडय़ाचा वार डोक्यावर करण्यात आलेला होता. तसेच मृतदेहावर पीठ टाकण्यात आले होते. विशेष म्हणजे तिन्ही हत्या गिरणीला साप्ताहिक सुटी असते त्या दिवशी झालेल्या होत्या, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यामुळे आता पोलीस ‘हॅमर किलर’चा शोध घेत आहेत.