ठाणे येथील गावदेवी परिसरात सोमवारी संध्याकाळी ठाणे परिवहन सेवेच्या बसने पदपथावरील महावितरणच्या विद्युत पेटीला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात तीन तरुण जखमी झाले. यातील एक जण गंभीर जखमी आहे. ही पेटी उडवल्याने विद्युतप्रवाह सुरू असलेल्या त्यातील तारा बसच्या खाली आल्या. बसमधील प्रवासी त्वरित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या तारांमुळे बसला शॉक लागत होता, असे काही प्रवाशांनी सांगितले.  
अक्षय वाघ (१९), रोहित घाडगे (१८) आणि सुनील कनोजिया (१९) अशी यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी अक्षय हा गंभीर जखमी असून त्याला ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर रोहित आणि सुनीलवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे परिवहन सेवेच्या वागळे आगारातून सुमारे ३० ते ४० प्रवाशांना घेऊन वृंदावन सोसायटीकडे निघालेली बस ठाणे स्थानक मार्गे जात होती. या बसने गावदेवी येथील कॅनरा बँकेसमोरील पदपथावर असलेल्या महावितरणच्या विद्युत पेटीला धडक दिली व पदपथावरून जाणाऱ्या अक्षय, रोहित आणि सुनील या तिघांना उडविले. बसला शॉक लागत असल्याने नागरिकांनी व नौपाडा पोलिसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून येथील विद्युतप्रवाह खंडित करण्यास सांगितले. त्यामुळे या भागातील विद्युतप्रवाह काही काळ खंडित करण्यात आला होता. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर पळून गेलेला बसचा चालक रामपती यादव याला पकडण्यात पोलिसांना यश आले. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.