महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र- उदयपूर, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एनसीपीए यांच्या सहयोगाने येत्या १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत रोज सायं. ६.३० वा. एनसीपीएच्या एक्सपिरिमेंटल थिएटरमध्ये हिंदी, कोंकणी आणि मराठी नाटय़कृतींचा त्रिभाषा नाटय़महोत्सव सादर होणार आहे. त्याअंतर्गत सोमवार, १२ ऑक्टोबरला मुंबईतील ‘रंगरेज सरोकार’ या संस्थेच्या ‘बदनाम मंटो’ या प्रख्यात साहित्यिक सआदत हसन मंटो यांच्या मृत्युत्तर परवडीवर भाष्य करणाऱ्या नाटकाचा प्रयोग होत आहे. तर मंगळवारी, १३ ऑक्टोबरला गोव्यातील ‘कलारचना’ संस्थेचे ‘पुरुष’ हे मूळ फ्रेंच नाटकाचे कोंकणी रूपांतर सादर होईल. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांचे होणारे सार्वकालीन शोषण हा या नाटकाचा विषय आहे. त्याचप्रमाणे ‘अपरांत’ संस्थेचे ‘सॉल सोलो’ हे नटाच्या शारीराभिनयातून पेश होणारे नाटकही याच दिवशी सादर होईल. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे राज्य नाटय़स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम पुरस्कारविजेते ‘न हि वैरेन वैरानि’ हे नाटक होईल. आदिमकाळातील मनुष्यप्राणी मानवी संस्कृतीच्या विकासप्रक्रियेत आपल्या उपजत, उत्स्फूर्त संवेदना हरवून बसला आणि त्याबरोबरच आपले माणूसपणही. ज्याची परिणती आज हिंसाचार, धार्मिक उन्माद, असंवेदनशीलता, माणसाचे अमानुष वर्तन यात झाले आहे, हा या नाटकाचा विषय आहे. या तिन्ही नाटय़प्रयोगांना रसिकांना विनामूल्य प्रवेश असून ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर नाटय़प्रयोगाच्या दिवशी प्रवेशिका उपलब्ध होतील, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.