07 December 2016

News Flash

पालिकेची साडेचारशे कोटींची तीन नवी सुसज्ज रुग्णालये!

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने कांदिवली शताब्दी रुग्णालय, कुपर आणि जोगेश्वरी

संदीप आचार्य, मुंबई | January 21, 2013 3:07 AM

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने कांदिवली शताब्दी रुग्णालय, कुपर आणि जोगेश्वरी येथील अजगावकर रुग्णालयांना अत्याधुनिक स्वरुप देतानाच या रुग्णलयांमध्ये तब्बल ७१३ खाटा वाढविल्या आहेत. यासाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च झाला असून येत्या १५ जुलै रोजी जुहू-विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ १५ ऑगस्ट रोजी कांदिवली शताब्दी आणि १५ सप्टेंबर रोजी जोगेश्वरी येथील आजगावकर रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. या रुग्णालयांमध्ये खाजगी व सार्वजनिक सहभागातून एमआरआय व सिटी स्कॅनची व्यवस्था पालिकेच्याच दराने सुरु करण्यात येणार असून मध्यमवर्गाला परवडू शकेल अशी ‘पेड बेड’ची संकल्पनाही राबविण्यात येणार आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मुंबईचे शांघाय बनविण्याच्या केलेल्या घोषणेत आरोग्याला काहीच स्थान नव्हते. राज्य शासनानेही मुंबईतील दोन हजार सालपर्यंतच्या झोपडय़ा अधिकृत करण्याची घोषणा केली असली तरी फुटकी कवडीही मुंबईच्या आरोग्यासाठी दिलेली नाही. अशावेळी मुंबईच्या आरोग्याचे शिवधनुष्य महापालिकेने उचलले असून उपनगरातील ९३ लाख लोकसंख्येचा विचार करून एकीकडे रुग्णालयांचे सक्षमीकरण करतानाच खाटा वाढविण्याचे धोरण स्वीकारले आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर म्हणाल्या, कुपर रुग्णालयाची सध्याची क्षमता ५२० खाटांची असून ६० खाटा वाढविण्यात येणार आहेत. कांदिवली शताब्दी रुग्णालय हे तीनशे खाटांचे तर जोगेश्वरी येथील आजगावकर रुग्णालय हे २६६ खाटांचे असणार आहे. यासाठी आवश्यक तो कर्मचारी व डॉक्टरांची पदे भरण्यात येणार असून नियोजित वेळेतच ही रुग्णालये सुरु करण्यात येतील. या रुग्णालयांमध्ये खाजगी-सार्वजनिक सहभागातून ना नफा ना तोटा म्हणजेच पालिकेने निश्चित केलेल्या दरांनुसार एमआरआय व सिटी स्कॅन चाचणीची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनेक लोकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नसते मात्र पालिका रुग्णालयात सामायिक स्वच्छतागृह व वॉर्डमुळे ते उपचारासाठी येत नाहीत. त्यामुळे नव्याने उभ्या राहणाऱ्या सर्व रुग्णालयांमध्ये यापुढे स्वतंत्र व्यवस्था असलेले ‘पेड बेड’ निर्माण करण्यात येणार असून एकूण क्षमतेच्या दहा टक्के खाटा या पेड बेड म्हणून ठेवण्यात येणार असल्याचे मनिषा म्हैसकर यांनी सांगितले. सध्या पूर्व व पश्चिम उपनगरातील पलिका रुग्णालयांमध्ये ३७८६ खाटा असून आगामी वर्षांत त्यात १०४७ खाटांची वाढ करण्यात येणार आहे.  

First Published on January 21, 2013 3:07 am

Web Title: three new equipped hospital of four hundred caror by municipal corporation