पवई तलावात बोट उलटून तीन जण बुडून मरण पावल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री याच तलावात तिघेजण बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून उर्वरितांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. चांदिवली, कुर्ला परिसरातील लुंबिनी बुद्धविहारामागे मनुभाई चाळीसमोर पवई तलावात तीन व्यक्ती मंगळवारी रात्री १०च्या सुमारास बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. हे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तलावामध्ये शोधकार्य सुरू केले. अंधारामुळे तलावात बुडालेल्यांचा शोध घेणे अवघड बनले होते. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला तर अन्य दोघांचा शोध सुरू होता.