बालविवाह आणि कुमारी मातांच्या समस्या या विषयाच्या विविध पैलूंवर चर्चात्मक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’ (टिस) आणि ‘यूएनएफपीए’ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याचा मान रुईया महाविद्यालयाच्या अवघ्या सतरा वर्षांच्या विद्यार्थ्यांनी पटकावला. इतक्या तरुण वयात राष्ट्रीय स्तरावरील या परिषदेत सहभागी होऊन बालविवाह आणि कुमारी मातांच्या समस्यांवर अभ्यास, संशोधनाच्या माध्यमातून सादरीकरण करणाऱ्या या तिन्ही विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाने विशेष अभिनंदन केले.
‘रामनारायण रुईया’ महाविद्यालयाच्या ‘सेंटर फॉर स्लम स्टडीज’(सीएसएस) विभागांतर्गत काम करणाऱ्या यश बलदेवा, संहिता कदम आणि हर्षला गुप्ते या तीन विद्यार्थ्यांनी दिल्लीत होणाऱ्या या परिषदेसाठी आपले नाव नोंदवले होते. शहरातील आर्थिकरीत्या मागास भागात अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी बालविवाह किंवा कुमारी मातांचे प्रश्न नेमके काय असतात या संदर्भातील काही आश्चर्यचकित करणाऱ्या बाबी आपल्या संशोधनातून मांडल्या. त्यांच्या या संशोधनामुळेच त्यांची परिषदेसाठी निवड झाली. चर्चासत्रात आपल्या विषयाची समर्पक मांडणी असावी यासाठी त्यांनी एक खास पोस्टरही तयार केले होते. कुमार वयात लग्न होताच कामा नयेत, हा मुद्दा पोस्टरवर ठासून मांडताना, असे बालविवाह रोखण्यासाठी काय करता येईल, याची थोडक्यात माहितीही त्यांनी पोस्टरवर दिली आहे. अभ्यासपूर्ण आणि कल्पक पद्धतीने तयार केलेल्या या पोस्टरसाठी ‘टिस’चे संचालक डॉ. परशुरामन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मेधा सोमय्या यांनी या तीन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डॉ. मेधा सोमय्या आणि ‘सीएसएस’च्या लुईसा रॉड्रिग्ज यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या चर्चासत्रासाठी सादरीकरण केले, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी या चर्चासत्राचा आढावा घेतला.

असा झाला प्रवास
आयआयटी गुवाहाटीमध्ये शिक्षण घेत असताना सिंग यांच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या विद्यार्थिनीने कॅम्पस नोकरी मिळणार नाही या भीतीने आत्महत्या केली. तेव्हापासून सिंग यांना ताण एखाद्याला जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त करू शकतो हा प्रश्न सतावू लागला. त्या आपल्या मित्र-मैत्रिणींना तुम्हाला कधी ताण आला आहे का, नैराश्य ओल आहे का असे विचारू लागल्या. त्यातील बहुतांश जणांनी सकारात्मक उत्तर दिले. यानंतर पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी १००० लोकांशी त्यांना येणारा ताण आणि नैराश्यावर चर्चा केली. यातून त्यांना असे लक्षात आले की बहुतांश लोकांना हे त्रास जाणवतात मात्र ते बोलण्यास धजावत नाही. मग त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांशीही चर्चा केली. तेथेही त्यांना लोक अशा आजारांसाठी आपल्याकडे येण्यास फारसे धजावत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे लोकांना त्यांचा ताण व्यक्त करण्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय सिंग यांनी घेतला. मात्र एक केंद्र सुरू करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि संकेतस्थळ सुरू केले.