मुलुंड येथील एका अल्पवयीन मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिच्या प्रियकरासह दोन युवक आणि एक अल्पवयीन युवती अशा तिघांना अटक केली आहे.
सिमरन सुनील केणी (१५) हिचे एका युवकावर प्रेम होते. प्रेमप्रकरण अयशस्वी झाल्यामुळे तिने शनिवारी डाव्या हाताच्या पंजावर ‘आय हेट यू’ असे लिहून मनगटाची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तो अयशस्वी ठरल्यामुळे तिने मुलुंडमधील महावीर टॉवरच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
सिमरन बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी शुक्रवारी रात्री मुलुंड पोलीस ठाण्यात नोंदवली होती. शनिवारी आत्महत्या केलेल्या एका मुलीचे छायाचित्र पोलिसांनी त्यांना दाखवले, तेव्हा ते सिमरनचेच असल्याचे या दोघांनी ओळखले. सिमरनचे गेल्या दोन वर्षांपासून एका मुलाबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते, असे सांगून तिच्या वडिलांनी तिच्या ३ मित्रांची नावे पोलिसांना सांगितली. हे प्रेमप्रकरण पसंत नसल्यामुळे मुलीचे वडील सुनील केणी यांनी अनेक वेळा तिचा मित्र साहिल शेख याच्या घरी जाऊन, ‘सिमरनला भेटू नको आणि तिचा नाद सोडून दे’ अशी समज दिली होती. सिमरनच्या आई-वडिलांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून मुलुंड पोलिसांनी साहिल शेख आणि कमलेशला अटक केली. या दोघांना भोईवाडा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली, तर अल्पवयीन मुलीची रवानगी सुधारगृहात केली.