केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने राज्यात मंत्री  होण्याची चालून आलेली संधी घ्यायची की खासदार म्हणून रहायचे असा पेच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासमोर निर्माण झाला आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या वतीने कोण शपथविधी घेणार, याबद्दलही कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे.
विधानसभा निवडणुकीत आठवले यांना केंद्रात मंत्रीपद देण्याच्या अटीवर रिपाइंने भाजपबरोर युती केली होती. परंतु केंद्रात दोनवेळा आश्वासन देऊनही त्यांना मंत्रीपदापासून दूरच रहावे लागले. आता राज्यात रिपाइंला एक मंत्रीपद देण्याचे मान्य केले आहे. परंतु भाजपची पहिली पसंती आठवले यांना आहे. तसा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे. मात्र त्यांनी केंद्रात मंत्री होण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. परंतु एकूण राजकीय वातावरण लक्षात घेता, आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता धूसर आहे. अशा वेळी राज्यात मंत्री व्हायचे की फक्त खासदार रहायचे असा त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. शिवाय आठवले मंत्री झाले, तर दुसऱ्या फळीतील नेत्यांची मंत्रीपदाची संधी हुकणार आहे. त्यामुळे पक्षात नाराजी व त्यातून दुही माजण्याची भीती काही कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. तर, मंत्रीपदासाठी पक्षात इतकी मोठी रस्सीखेच सुरु आहे, त्यामुळे आठवले स्वतच मंत्री झाले तर पक्षातील अंतर्गत सत्तासंघर्ष कमी होईल, असेही काही कार्यकर्त्यांना वाटते. आता आठवले काय निर्णय घेतात, यावर रिपाइंचे पुढील सारे राजकारण अवलंबून राहणार आहे.