प्राथमिक विभागातील ५०० वक्ते.. विभागीय अंतिम फेरीत आपल्या भाषणांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे १२० हून अधिक वक्ते.. या १२० वक्त्यांमधून सवरेत्कृष्ट ठरलेले नऊ वक्ते.. ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता या स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी पार पडणार आहे. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात होणाऱ्या या महाअंतिम फेरीत नऊ वक्त्यांमध्ये चुरस रंगणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून वक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’च्या महाअंतिम फेरीत राज्यभरातील आठ विभागांतून नऊ वक्त्यांची निवड झाली आहे. यात आकांक्षा चिंचोलकर (औरंगाबाद), रिद्धी म्हात्रे (ठाणे), रसिका चिंचोळे (नागपूर), आदित्य कुलकर्णी (रत्नागिरी), श्रेयस मेहेंदळे (मुंबई), कविता देवढे (अहमदनगर), शुभांगी ओक (नागपूर), नेहा देसाई (पुणे) आणि काजल बोरस्ते (नाशिक) यांचा समावेश आहे. नागपूर विभागातून प्राथमिक फेरीसाठी १५०हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने या विभागातून महाअंतिम फेरीसाठी दोन स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. महाअंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धक वक्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे शुक्रवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जनकल्याण सहकारी बँक आणि तन्वी हर्बल्स यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. महाअंतिम फेरीत या स्पर्धकांमधून ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ निवडण्यासाठी रुईया महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक आणि वक्तृत्वापासून नाटकांपर्यंत सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांत मोलाची कामगिरी बजावणारे विजय तापस आणि ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. त्याशिवाय अनेक मान्यवर या स्पर्धेतील वक्त्यांची भाषणे ऐकण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

बोलावे ते कैसे ?..

महाअंतिम फेरीसाठी निवड झालेल्या नऊ स्पर्धकांना वक्तृत्वाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी ‘लोकसत्ता’तर्फे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वक्त्या, निवेदिका आणि सूत्रसंचालिका धनश्री लेले यांनी विषयाची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात अभिनेता आणि कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांनी संवादकौशल्य आणि आवाजातील चढउतार यांच्यासाठी आवश्यक असे काही महत्त्वाचे व्यायाम सांगितले तर पुढील सत्रात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी विषयाचे सादरीकरण, वादविवाद आणि वक्तृत्त्व स्पर्धामध्ये भाषण करताना घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

*स्पर्धा कधी? – आज, शनिवार,
१४ फेब्रुवारी २०१५
*कुठे? – लोकमान्य सेवा संघाचे पु. ल. देशपांडे सभागृह. विलेपार्ले, पूर्व.
*किती वाजता – सायं. ५.३० वाजता.
कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य
असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल.
काही जागा निमंत्रितांसाठी राखीव.
महाअंतिम फेरीतील नऊ वक्त्यांमधून लालित्यपूर्ण शैलीत भाषण करणाऱ्या वक्त्याला चंद्रकांत कुलकर्णी पुरस्कृत प्रा. वसंत कुंभोजकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप असेल.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहुणे
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्या अमोघ वाणीने महाराष्ट्रात आणि भारतातच नाही, तर परदेशातही पोहोचवणारे, शिवचरित्रावर हजारांहून अधिक कार्यक्रम करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या महाअंतिम फेरीचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्पध्रेदरम्यान बाबासाहेबही स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.