ग्रीसवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे युरोपीयन युनियनमध्ये सुरू असलेली घालमेल, त्याचे जागतिक आणि भारतीय अर्थकारणावर होणारे परिणाम यावर आजची तरुण पिढी किती लक्ष ठेवून आहे, याचा प्रत्यय ‘लोकसत्ता’च्या ‘फेसबुक चॅट’मध्ये मंगळवारी आला. ग्रीसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ’ग्रीसचे काय होणार?’ या प्रश्नाशी संबंधित जवळपास तीनशेहून अधिक वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. नवे सरकार, उद्योगनिर्मितीला चालना आणि कुशल मनुष्यबळ यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे महत्त्व वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर देशातील लोक, विशेषत: तरुण वर्ग आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवून असतात आणि त्यांना ते विषय तज्ज्ञ व्यक्तींकडून समजून घ्यायचे असतात, याचा प्रत्यय या ‘फेसबुक चॅट’मधून आला.
ग्रीसच्या घडामोडीचा भारताच्या उद्योग आणि रोजगारावर काय परिणाम होईल, इंग्लंडप्रमाणे चलन असते तर ते छापून ग्रीसला ही नामुष्की टाळता आली असती का, ग्रीसला संघाबाहेर न ठेवता युरोपला मंदीच्या तडाख्यातून बाहेर काढण्याचे काय उपाय योजावे लागतील, ग्रीसने सार्वमत घेणे योग्य होते का, सध्याच्या परिस्थितीमागे कोणत्या विचारसरणीची पाश्र्वभूमी आहे का, ग्रीस स्वत:हून युरोझोनमधून बाहेर पडला तर काय, असा ग्रीसमधील अरिष्टाचा धांडोळा घेणा-या प्रश्नांनी हा संवाद समृद्ध केला.
ग्रीसमधील पेचप्रसंगाचा सर्व बाजूंनी वेध घेतानाच पुढील वर्षी केंद्र सरकारतर्फे लागू होणारा सातवा वेतन आयोग, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम, देशातील उद्योगांवर ग्रीस संकटाचा परिणाम होईल का, ग्रीसमध्ये पर्यटनाला जावे का, तिथे नोकरी पत्करावी का अशा स्थानिक आणि सामान्य मनाची उत्सुकता चाळवणाऱ्या प्रश्नांचाही यामध्ये समावेश होता.
आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली मते मांडतानाच ग्रीसच्या पाश्र्वभूमीवर अर्थतज्ज्ञ म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला आणि जनतेला काही सूचक इशारा देऊ इच्छिता का, हेदेखील कुबेर यांना आवर्जून विचारले. तसेच भारतीयांना कमीत कमी पशात कसे चालवायचे ते बरोबर माहीत आहे, असा मिश्किल उपायही एका वाचकाने सुचवला.