राज्यात टोलविरोधी आंदोलनाचे वारे वाहत असताना मुंबईत खासगी वाहनाने ये-जा करणाऱ्यांना आता १ ऑक्टोबरपासून वाढीव टोलचा भरुदड सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात करारानुसार वाढ करण्यात येत असून त्यानुसार कारचालकांना ३०ऐवजी ३५ रुपये टोलपोटी मोजावे लागतील, तर अवजड वाहनांसाठी ही वाढ १५  ते २० रुपयांची असेल.
मुंबईतील प्रवास जलदगतीने होण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांच्या खर्चाची वसुली म्हणून मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि एलबीएस मार्ग या मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोलनाके उभारण्यात आले. ‘मुंबई एन्ट्री पॉइंट लि.’ या जयंत म्हैसकर यांच्या कंपनीमार्फत या पाचही ठिकाणी वाहनचालकांकडून टोलवसुली केली जाते. राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात तीन वर्षांनी वाढ होते. सप्टेंबर २००२ मध्ये दर तीन वर्षांनी अशा रीतीने टोलच्या दरात वाढ होईल याबाबतची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार दर तीन वर्षांनी मुंबईच्या टोलदरात वाढ होते. त्यानुसार आता १ ऑक्टोबरपासून टोलदरवाढ होत आहे.