गेल्या आठवडय़ापासून किमतीचा चढता आलेख गाठणाऱ्या उत्तम प्रतीच्या टॉमेटोच्या दरांनी किरकोळ बाजारात बुधवारी शंभरी ओलांडली.
आवक मंदावल्याने एपीएमसीच्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा अजूनही २५ रुपयांनी विकला जात असून किरकोळ बाजारात अजूनही तो चाळिशीच्या आसपास घुटमळत आहे.
वाशी बाजारात सोमवारी भाज्यांची भरपूर आवक झाली. त्यामुळे भाज्यांचे दर गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत कमी झाले. मात्र उत्तम प्रतीचा टॉमेटो अजूनही ७० रुपयांनी विकला जात आहे. गवार, घेवडा, ढेमसे अशा काही भाज्यांचे घाऊक दर किलोमागे ५५ रुपयांपर्यंत पोहचले असून चांगल्या प्रतीचे आले ७५ रुपयांनी विकले जात आहे. भेंडी (४४), दुधी (४०), फ्लॉवर (१८), कोबी (२०) आदी भाज्यांचे दर तुलनेने कमी असले तरी किरकोळ बाजारात त्या ७०-८० रुपये दराने विकल्या जात आहेत. जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने टॉमेटोचे उत्पादन खालावले असून नवा टॉमेटो बाजारात येण्यासाठी आणखी ४० दिवस लागतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.