‘कॉर्पोरेट’ संस्कृतीमुळे वाढलेला कामाचा ताण आणि लांबलचक सुट्टय़ांच्या अर्जाला मिळणारी केराची टोपली यामुळे वर्षभरात सणाला लागून येणारे ‘वीकेण्ड’मुळे सलग मिळणारी ३-४ दिवसांची सुटी पर्यटनासाठी सत्करणी लावण्याकडे मुंबईकरांचा कल वाढत आहे. यंदाही होळी-धूळवड आणि त्याला लागून आलेली शनिवार-रविवारची सुटी ही संधी साधत महाबळेश्वर, गोवा, माथेरान यासारख्या नजीकच्या पर्यटनस्थळांपासून केरळ व थेट परदेशी जाण्याचा कार्यक्रम मुंबईकरांनी आखल्याने अशाप्रकारच्या छोटय़ा सुटीच्या पर्यटनात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गुरुवारी होळीची सुटी, शुक्रवारी धुळवड आणि पुढे शनिवार-रविवार अशा चार दिवसांच्या छोटेखानी सुटीचा योग आला आहे. . कॉर्पोरेट कंपन्यांमधून वारंवार मोठी सुट्टी घेणे शक्य होत नसल्याने वर्षभरात ठराविक अंतराने सणावाराला जोडून येणाऱ्या साप्ताहिक सुटय़ांचे नियोजन पर्यटनासाठी करण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. शिवाय, हवाई कंपन्याही सणांच्या निमित्ताने तिकीटांचा ‘सेल’ करत असल्याने आधीपासून आरक्षण करणाऱ्यांना प्रवासखर्चात ४० टक्के बचत करता येते. याचाच फायदा घेत होळीसारख्या सुट्टीत केरळ, अंदमान, शिमला, भूतान, दार्जिलिंग अशा ठिकाणी फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे ‘कॉक्स अँड किंग्ज’चे संपर्कप्रमुख करण आनंद यांनी सांगितले.
यावर्षी होळीसाठी पर्यटनाला बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत ३० टक्के एवढी वाढ झाली असल्याचे आनंद यांनी सांगितले.

आमच्याकडे कोकणातील जवळपासची ठिकाणे, लोणावळा-खंडाळा येथील हॉटेल्स आधीपासूनच आरक्षित झाले आहेत. केवळ होळीच्या या आठवडय़ात ‘थॉमस कुक’च्या पॅकेजविक्रीत २६ ते २८ टक्के वाढ झाली आहे.
– राजीव काळे, थॉमस कुकच्या देशांतर्गत पर्यटन विभागाचे अध्यक्ष