मुंबईत अनेक भागांमध्ये रस्त्यावर पार्किंग केले जाते. अशा वेळेस आपली गाडी सुरक्षित आहे की नाही याबाबत मनात सतत शंका येत असते. यावर तोडगा म्हणून दिल्लीतील प्रन्शु गुप्ता यांनी ‘ट्रॅक एन टेल’ ही सुविधा सुरू केली आहे.

अशी झाली सुरुवात

मुंबईसह अनेक शहरांमध्ये रस्त्यालगत गाडी उभी करण्याशिवाय पर्याय उरत नाही. गाडी रस्त्यावर उभी राहिली की त्याच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न मालकाच्या मनात येत राहतात. गाडी चोरीला जाईल का किंवा गाडीतील कोणता भाग चोरीला जाईल का? अशा अनेक प्रश्नांमुळे गाडीचा मालक काही प्रमाणात चिंतेत असतो. याचबरोबर सध्या ओला किंवा उबेरसारख्या टॅक्सी सेवांसाठी अनेक जण गाडय़ा चालकाच्या ताब्यात देतात. आपली गाडी कुठे हे समजण्यासाठी मालकाला अ‍ॅप दिले आहे. मात्र जर चालकाने अ‍ॅप बंद केले तर गाडीची सद्य:स्थिती मालकाला समजू शकत नाही. यामुळे चालक आपली गाडी घेऊन कुठे गेला तर, अशी शंका मालकांच्या मनात सतत येत राहते. असाच अनुभव सॉफ्टवेअर अभियंता प्रन्शु गुप्ता यांना आला. त्यांचा चालक एके दिवशी त्यांची गाडी घेऊन फिरायला गेला. तो येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता. त्या वेळेस त्यांना असे जाणवले की, आपली गाडी कुठे आहे हे आपल्याला घरात बसून समजायला हवे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणे आवश्यक आहे. तो काळ साधरणत: २००८चा होता. त्या वेळेस स्मार्टफोनचा वापर आता एवढा सर्रास झाला नव्हता. यामुळे तशी यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात असणे शक्यच नव्हते. मग त्यांनी त्यावर काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आले की अमेरिकेत अशा प्रकारची यंत्रणा आहे. मात्र ती यंत्रणा भारतात आयात करून येथे वापरणे म्हणजे खूप खर्चीक होते. मग भारतात याची निर्मित करण्याचा विचार केला. तेव्हा असे लक्षात आले की परदेशात वापरले जाणारे उपकरण चीनमध्ये तयार केले जाते. चीनमधून हे उपकरण मागविण्यात आले. त्याच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. मात्र चीनमध्ये हे उपकरण तयार करताना परदेशातील वातावरणाचा विचार केला होता. यामुळे भारतातील खड्डे किंवा धुळीच्या वातावरणात हे उपकरण काम करू शकत नव्हते. यामुळे या उपकरणाची निर्मिती भारतातच करण्याचा निर्णय घेतला आणि काम सुरू केले. उपकरण चालविण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर लिहिण्याचे काम सुरू करण्यात आले व उपकरणाची निर्मिती प्रक्रियाही सुरू करण्यात आली. हे सर्व करत असताना जे काही नवीन शोध लागले त्याचे पेटंट मिळण्यासाठीही अर्ज करण्यात आला आहे.

असे चालते काम

कंपनीने एक छोटेखानी उपकरण तयार केले आहे. हे उपकरण आपण गाडीत लावायचे असते. या उपकरणात एक सिमकार्ड असते व ते जीपीएसवर काम करते. ते आपल्या मोबाइलशी ट्रॅक एन टेलच्या अ‍ॅपच्या माध्यमातून जोडलेले असते. हे स्वतंत्र उपकरण असल्यामुळे  चालकाला किंवा चोराला ते बंद करणे शक्य नसते. तसेच हे उपकरण गाडीच्या डॅशबोर्डमध्ये लावले जाते यामुळे ते काढणेही सहज शक्य होत नाही. यामुळे उपकरण गाडीत असताना गाडी कुठे आहे हे आपल्याला घरबसल्या समजू शकते. याचबरोबर यामध्ये अशी एक विशेष सुविधा देण्यात आली आहे ज्यात तुम्हाला गाडी चोरीला गेल्याचे वाटले तर अ‍ॅपच्या एका क्लिकवरून तुम्ही गाडीचे इंजिन बंद करू शकता. यामुळे गाडी आहे त्याच ठिकाणी थांबते व तुम्हाला तुमच्या गाडीचा माग घेणे सोपे होते, असे प्रन्शु गुप्ता यांनी सांगितले. याशिवाय यामध्ये इंजिनचे आरोग्य तपासणारी यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुमच्या गाडीच्या इंजिनची स्थिती यामधून तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यात काही बिघाड असला तरी अ‍ॅप तुम्हाला सूचित करते. पण आपल्या देशात गाडीच्या सुरक्षेबाबत लोकांना काळजी वाटत असली तरी त्यासाठी पैसे खर्च करण्याची त्यांची मानसिकता नसते. यामुळे ग्राहकांना आपल्या उत्पादनाकडे वळविणे आमच्यासाठी मोठे आव्हान होते. आजही हे आव्हान कायम आहे मात्र आता त्यांची मानसिकता बदलू लागल्याचेही गुप्ता यांनी नमूद केले. आधी सुरक्षेचे उत्पादन विकल्यानंतर इंजिनाच्या आरोग्यसाठीचे उत्पादन विकण्याचा आमचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

सॉफ्टवेअर क्षेत्रात अनेक वष्रे काम केल्यानंतर प्रन्शु यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुरुवातीला त्यांच्या बचतीमधील काही हिस्सा घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. यानंतर व्यवसाय काहीसा स्थिरावला व त्यांनी गुंतवणुकीसाठी प्रयत्न सुरू केले व गुंतवणूक मिळवली. उपकरणाच्या विक्रीतून होणारे उत्पादन हे कंपनीचे थेट उत्पादन आहे. यात उपकरण व त्यासोबत देण्यात येणारे सिमकार्ड याची किंमत घेतली जाते. याशिवाय कंपनीची सेवा घेण्यासाठी काही मासिक वर्गणीदर आकारले जातात. या दरांमधूनही कंपनीला उत्पन्न होते. मात्र यातही एक आव्हान होते आपल्याकडे ग्राहक सेवेचे नूतनीकरण करताना अनेकदा विचार करतात. यामुळे आता आम्ही एकदाच उपकरणासोबत तीन वर्षांच्या सेवेचे मूल्यही घेत असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

भविष्याची वाटचाल

भविष्यात ही सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कंपनीत संशोधन सुरू आहे. हे संशोधन पूर्ण झाल्यावर अनेक नवी उत्पादने बाजारात आणण्याचा आमचा मानस असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

नवउद्यमींना सल्ला

नवउद्योग सुरू करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे आपण प्रचंड मेहनत करण्यची तयारी ठेवावी. मेहनत केल्यानंतरच तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळते. ही मेहनत करत असताना अनेकदा आपल्याला आराम मिळत नाही तरीही न थकता सतत काम करत राहणे आपल्यासाठी अपरिहार्य असते असा मोलाचा सल्ला गुप्ता यांनी नवउद्यमींना दिला. याचबरोबर केवळ एक संकल्पना सुचली आणि आपण उद्योग सुरू केला असे होत नाही. निधी उभारणीसाठीही खूप मेहनत घ्यावी लागते. याचबरोबर आपण नवउद्योगांची जी काही उदाहरणे पाहतो ती सर्व यशस्वी उद्योगांची आहे. पण प्रत्येक दहा नवउद्योगांमध्ये सात नवउद्योग अपयशी होत असतात. यामुळे आपल्याला यशस्वी सात मध्ये कसे जात येईल यावर विचार करा असा सल्लाही त्यांनी दिला.

@nirajcpandit