कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस विलास शिंदे यांची नेत्रदान करण्याची इच्छा होती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. खारमधील एस व्ही रोडवरील मॅक्लॉइड पेट्रोलपंपाजवळ विलास शिंदे कर्तव्य बजावत असताना अहमद मोहम्मद अली कुरेशी याने केलेल्या हल्ल्यात विलास शिंदे गंभीर जखमी झाले होते. कुरेशीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलास शिंदे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. डोक्यावर प्रहार झाल्याने शिंदे कोमात गेले होते. गेल्या आठवड्याभरापासून त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. विलास शिंदे यांच्या नेत्रदानाबद्दल शवविच्छेदनानंतर कुटुंबियांनी त्यांची इच्छापूर्ण करण्यासाठी लीलावती रुग्णालय नेत्रदान केले. त्यानंतर त्यांचे पार्थिव वरळीतील घरी आणण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व वाहतूक पोलीस एक दिवसाचे वेतन विलास शिंदेंच्या कुटुंबियांसाठी मदत म्हणून देणार आहेत. ही मदतीची रक्कम साधारणपणे ३० लाखांपर्यंत जमा होईल.तसेच गुरुवारी सर्वपक्षीयांकडून या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी बुधवारी विलास शिंदे यांच्या  कुटुंबियांची भेट घेतली. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यातील वाढत्या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी शिंदे राहत असलेल्या पोलीस वसाहतीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालून घोषणाही दिल्या.