‘रंगासंगे खेळूया वाहतूकीचे नियम पाळूया..’ या अभिनव उपक्रमांतर्गत रविवारी ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये सातवी ते नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तीन हात नाका परिसरातील संरक्षक भिंतीवर वाहतूक नियमांचे संदेश देणारी सुमारे २६ चित्रे काढली. ‘शाळेत जाणारी मुले म्हणजे कोंबलेली फुले’, ‘पृथ्वी वाचवा इंधन टाळा’, ‘एक कदम स्वच्छता की ओर’ आणि ‘वाहतूकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा’, अशा आशयाची ही चित्रे काढण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, वाहतूक नियमांविषयी माहिती देणाऱ्या या चित्रांमुळे तीन हात नाका येथील सेवा रस्ता जणू आर्ट गॅलरीच बनला आहे.
फोटो गॅलरीः ‘वाहतूक चित्र जागृती’ 
ठाणेकरांना वाहतूक नियमांविषयी माहिती मिळावी आणि त्यांनी त्याचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांनाही या नियमांविषयी ज्ञान व्हावे, या हेतूने ठाणे वाहतूक  शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी ‘रंगासंगे खेळूया वाहतूकीचे नियम पाळूया..’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रविवारी तीन हात नाका परिसरात राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये ठाणे शहरातील सुमारे १४ शाळांमधील १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. तीन हात नाका येथील संरक्षक भिंतीवर सकाळपासून दुपापर्यंत वाहतूक नियमांचे संदेश देणारी चित्र काढण्यात विद्यार्थी व्यस्त होते. दरम्यान, ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटातील सायली कवठेकर, पुष्कर कोणारकर, दुर्गेश बडवे, चैतन्य बडवे, चैतन्य कुलकर्णी, वेदांत कवडे या सहा बालकलाकरांनी भिंतीवर काढण्यात आलेल्या चित्रांची पाहाणी केली. तसेच सह पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते चित्रे काढणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. लहान मुलांनी दिलेले वाहतूकीचा संदेश मोठय़ांपर्यंत पोहचावा, हा कार्यक्रमा मागचा हेतू असल्याचे लक्ष्मीनारायण यांनी यावेळी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी माहिती मिळावी, यासाठी सोमवारी ठाणे शहरातील वेगवेगळ्या शाळेमधील विद्यार्थ्यांना तीन हात नाका येथील संरक्षक भिंतीवर काढण्यात आलेली चित्रे दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे संरक्षक भिंतीवर चित्रे काढण्यात आलेला तीन हात नाका येथील सेवा रस्त्याचा काही भाग सोमवारी वाहतूकीसाठी बंद ठेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी यावेळी दिली.