अतिक्रमणे हटवून रस्ता दीडशे मीटर रुंद
मुंबई-ठाणे या दोन शहरांतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या मुलुंडच्या लालबहादूर शास्त्री मार्गावरील (एलबीएस रोड) दूर करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या मार्गावरील महाराणा प्रताप चौक ते मॉडेला चेकनाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली दुकानांची गर्दी हटवून हा रस्ता दीडशे मीटर रुंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी होणारी वाहतूक कोंडी दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाण्याच्या दिशेने जाता-येताना एलबीएस प्रवेशद्वारावर अनेक वष्रे चिंचोळा आणि अरुंद रस्ता राहिला आहे. शिवाय येथील जकात नाक्याचे प्रवेशद्वार, दोन्ही बाजूंना बार आणि रेस्टॉरंट यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, त्यातही अवजड वाहनांची होणारी वाहतूक, ठाण्याकडून मुलुंड-मुंबईकडे होणारी इतर वाहतूक, पोलिसांची संरक्षक चौकी यांच्या गर्दीमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणे कठीण होते. त्यातच या चौकात बस डेपो आणि रिक्षा, टॅक्सी तळांमुळे हा महामार्ग आहे की गल्लीतला रस्ता, असा प्रश्न पडतो. वाहतुकीची होणारी कोंडी ही येथे नित्याची असून या मार्गाच्या रुंदीकरणाबाबत चर्चा केल्या जात होत्या. मात्र पालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांनी यासाठी कारवाई केली नव्हती, तर यापूर्वी ज्या पालिका विभाग अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास न करता धडक कारवाई करण्याचा प्रयत्न केला ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. एकंदर या रस्त्याच्या रुंदीकरणात अनेक अडथळे येत होते. दरम्यान, अलीकडे मुलुंड टी विभागाने या मार्गाच्या विस्तारीकरण करण्यासाठी सर्वेक्षण केले आहे त्यानुसार रस्त्याच्या मार्गात येणाऱ्या पोलीस आणि पालिकेच्या तीन चौक्या, दोन बार आणि उपाहारगृहे अशा एकूण १७ व्यावसायिक आस्थापनांना अस्तित्वाचे पुरावे सादर करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात येथील रस्त्याच्या डावी आणि उजवीकडे असलेली अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. अस्तित्वाच्या पुराव्यानुसार पात्र आस्थापनांना पर्यायी जागा दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत हा मार्ग अतिक्रमणमुक्त आणि वाहतुकीला सरळ सोपा होण्याची शक्यता आहे.

एलबीएस मार्गावर चेकनाका येथे वाहतुकीची खूप मोठी कोंडी होते. पहिल्या टप्प्यात येथील अतिक्रमणे हटवून संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येत्या ऑक्टोबरपासून या मार्गाच्या कामाला सुरुवात होईल.
– प्रशांत सकपाळे, साहाय्यक पालिका आयुक्त, टी विभाग