पावसाळ्यापूर्वी जोरदार तयारी झाल्याचे दावे केले जात असतानाच शनिवारी सकाळी हलक्या सरींनेच शहर व उपनगरात काही भागांत पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई शहरातून उपनगरात जाण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग प्रमुख मानले जातात. मात्र पावसाच्या काही सरींतच रस्त्यावर काही प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वेपोठापाठ रस्ते वाहतूकही काही वेळासाठी मंदावली होती. यात शाळा सुरू होत असल्याने लोक एकाचवेळी रस्त्यावर आल्याने सायंकाळी काही भागांत कोंडी निर्माण झाली होती.
सकाळी जेमतेम २५ ते ३० मिनिंटे पावसाच्या हलक्या सरीं कोसळल्याने उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, दहिसर या भागांत काही प्रमाणात पाणी साचले होते. परिणाम रस्ते वाहतुकीला याचा फटका बसला. अनेक मार्ग निसरडे झाल्याने वाहन चालकही खबरदारी म्हणून वाहन कमी वेगाने चालवत होते. त्यामुळे सायंकाळी गोरेगाव, मालाड, कांदिवली, आणि दहिसर भागांत वाहतूक कोंडी झाली होती. यात येत्या काही दिवसांत शाळा सुरू होणार असल्याने लोक खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडल्याचे वाहतूक पोलीसांकडून सांगण्यात आले. तर मुलुंड भागात एका वाहनाचा अपघात झाल्याने त्या भागातही वाहतूक कोंडी झाल्याचे सांगण्यात आले.