मद्यपी चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला सात वर्षे उलटल्यावरही मद्यपी चालकांच्या संख्येत फारशी घट झालेली नाही. आतापर्यंत तब्बल १ लाख ७० हजार जणांविरोधात कारवाई झाली असून ५७ हजारांहून अधिकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. मात्र तरीही बेहोश, मजा-मस्ती आणि मित्रांची संगत यामुळे दारू पिऊन मोटरसायकल चालवणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असल्याने पोलिसांना कारवाईसोबत जनजागृतीवरही भर द्यावा लागत आहे.
मद्यपी चालकांविरोधात तेव्हाचे वाहतूक शाखेचे उपायुक्त हरीश बैजल यांनी पुढाकार घेऊन २० जून २००७ रोजी मोहीम सुरू केली होती. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल १,२४,५१७ जणांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यापैकी ५७,३५९ जणांना साधा तुरुंगवासही भोगावा लागला. म्हणजेच दरवर्षी साधारण १५ हजारांहून अधिक जणांवर कारवाई झाली. गेल्या तीन वर्षांच्या आढावा घेतला तरीही या संख्येत फारसा फरक पडलेला नसल्याचे दिसते. १ जानेवारी २०१५ पासून गेल्या चार महिन्यांत आतापर्यंत २६८५ जणांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून ६८९ जणांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. ४१६ जणांचे परवाने कायमस्वरूपी रद्दही केले गेले आहेत. दरवर्षी दंडाच्या स्वरूपात अडीच ते साडेतीन कोटी रुपये जमा होतात. मात्र एवढी कारवाई होऊनही मद्यपी चालकांच्या संख्येत फारशी घट झालेली नाही.
२००९ मध्ये आतापर्यंतचे सर्वात जास्त, ९ हजारांहून अधिक जणांचे परवाने रद्द झाले होते. २०१० मध्ये ८,३५४, तर २०११ मध्ये ६,०३७ जणांचे परवाने रद्द झाले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये मात्र परवाने रद्द होण्याचे प्रमाण चार हजारांवर आले. २०१४ मध्ये केवळ ३ हजार जणांचे परवाने रद्द झाले. एकीकडे मद्यपी चालकांच्या संख्येत घट होत नसताना कारवाई होऊन परवाने रद्द होण्याचे प्रमाण मात्र कमी होत आहे.
दरवर्षी कारवाई केल्या जात असलेल्या मद्यपी चालकांमध्ये सुमारे नऊ ते साडेनऊ हजार चालक हे १८ ते ३५ वयोगटातील मोटरसायकलस्वार असतात. तारुण्याच्या जोशात सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. हेल्मेट न घालणे, दारू पिऊन गाडी चालवणे, मित्रांच्या संगतीने वेग वाढवणे यासाठी सातत्याने कारवाई होऊनही दरवर्षी नवनवीन तरुण यात ओढले जातात. त्यामुळे कारवाईत सातत्य ठेवूनही मद्यपी चालकांची संख्या कमी होताना दिसत नाही, अशी माहिती वाहतूक खात्याचे उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी दिली. महाविद्यालयांमध्ये याबाबत जागृती शिबिरे घेतली जात आहेत, त्याचा परिणाम काही काळाने दिसू लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

वर्ष आणि कारवाई
२००८ – १६,४५०
२००९ – १४,६८१
२०१० – १६,२९०
२०११ – १६,३२४
२०१२ – १४,१३३
२०१३ – १५,८९७
२०१४ – १५,५४१
२०१५ – 0२६८५