विनाहेल्मेट दंड चुकवण्यासाठी दुचाकीस्वारांची कारणे
‘औषध आणायला निघालो होतो’, ‘बायकोला सोडायला आलो होतो’, ‘इथल्या इथेच निघालोय’, ‘लक्षातच राहिलं नाही’.. अशी एक ना अनेक कारणे सांगून दुचाकीस्वार आणि त्यांच्या मागे बसणारे हेल्मेटसक्तीतून पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दुचाकी चालवणाऱ्यांसोबत सहप्रवाशालाही हेल्मेट घालणे बंधनकारक करण्याच्या निर्णयानंतर मुंबईत वाहतूक पोलिसांनी कडक तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना आर्थिक दंडाला सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी एकाहून एक बहाणे करत आपली सुटका करण्याचा प्रयत्न दुचाकीस्वार करतात; परंतु आता पोलिसांनाही हे बहाणे ठाऊक झाल्याने त्यांचे प्रयत्न अपयशी ठरतात.
पोलिसांच्या वाहतूक शाखेने मोटारसायकलस्वारांपाठोपाठ आता सहप्रवाशांनाही हेल्मेटसक्ती लागू केली आहे. हेल्मेट न बाळगण्याची एक ना अनेक कारणे यामुळे वाहतूक पोलिसांना ऐकायला मिळत आहेत. त्यातील काही अगदीच बाळबोध तर काही विचित्र कारणेही कानी पडत आहेत. अनेकदा सहप्रवासी जवळच जात असल्याने हेल्मेट घातले नाही, असे प्रांजळपणे कबूल करतात, हेल्मेट घरी विसरल्याचे मान्य करून दंड भरतात, असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले; पण काही सहप्रवासी पोलिसांशी हुज्जत घालत बसतात. ‘मित्र रस्त्यात भेटला म्हणून त्याच्यासोबत निघालो. मला काय स्वप्न पडले होते का’ अशी उत्तरे त्यांच्याकडून ऐकावी लागतात. विशेषत: सहप्रवासी महिला असेल तर ही शाब्दिक चकमक वाढत जाते, असा अनुभव काही वाहतूक पोलिसांनी सांगितला.
शहरात वाढलेल्या रहदारीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे, अशा अपघातांमध्ये मागे बसणाऱ्या व्यक्तीला सर्वाधिक इजा होते, त्यामुळे त्यांनी हेल्मेट घालणे गरजेचे आहे; परंतु याबाबत अद्याप जनतेत गांभीर्य आलेले नाही, असे मत वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. वाहतूक पोलीस दंडाच्या रक्कम जमवण्यासाठी नाही तर प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचावा यासाठी उन्हातान्हात उभे राहतात. नियमांचे पालन केले तर नागरिकांच्याच जीविताचे रक्षण होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. विनाहेल्मेट मोटारसायकलस्वारापेक्षा सहप्रवाशाने हेल्मेट घालण्याची सवयच नसल्याने नियम रुळण्यास थोडा वेळ जाईल, पण महिन्याभरात नागरिक हेल्मेट घालू लागतील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.