सरकारने ‘व्हच्र्युअल नेटवर्क ऑपरेटर’ची निर्मिती करून इतर मोबाइल नेटवर्क कंपन्यांची सुविधा वितरित करावी अशी सूचना ट्रायने केली आहे. यामुळे सर्व नेटवर्कच्या ग्राहकांना मोबाइल सेवेचे एकच बिल मिळणे शक्य होणार आहे. यामुळे बिलांच्या गोंधळाचे प्रमाण कमी होणे शक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मोबाइल नेटवर्कच्या परवान्यांचे ‘व्हच्र्युअल नेटवर्क ऑपरेटर’च्या मदतीने डिलिंकिंग करण्यासंदर्भात सूचना करण्यासाठी दूरसंचार विभागाने दूरसंचार नियमन प्राधिकरणाला (ट्राय) काही पर्याय सुचविण्यास सांगितले होते. त्यानुसार ट्रायने सल्लापत्र प्रसिद्ध करून त्यावरील हरकतींनुसार सुधारणा करून अंतिम सूचना दूरसंचार विभागाला पाठविल्या आहेत.
या सूचनांमध्ये ‘व्हच्र्युअल नेटवर्क ऑपरेटर’ची निर्मिती करणे फायद्याचे ठरेल असे सुचविण्यात आले आहे. याची निर्मिती नवीन दूरसंचार सेवा पुरवठादार म्हणून व्हावी असे सुचविण्यात आले आहे. ही कंपनी मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या आणि ग्राहकांमधील दुवा राहील आणि फेरविक्रीचे काम करील. यामुळे सर्व नेटवर्कच्या सुविधा एका छताखाली येतील आणि किरकोळ विक्रेत्याप्रमाणे ‘व्हच्र्युअल नेटवर्क ऑपरेटर’च्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचतील. यामुळे सर्व नेटवर्कच्या ग्राहकांना एकच बिल मिळणे शक्य होणार आहे. व्हच्र्युअल नेटवर्क ऑपरेटरसंबंधात ट्रायने अनेक सूचनाही केल्या आहेत.