हार्बर रेल्वेमार्गावर सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास वांद्रे येथून सीएसटीकडे येणाऱ्या लोकलचा डबा सीएसटी ते मस्जिद दरम्यान रुळावरून घसरल्याने हार्बरची वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्प होती. मोटरमनच्या मागचा महिलांचा दुसरा डबा रुळावरून घसरल्याने हार्बरच्या तिन्ही मार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तिन्ही मार्ग बंद झाल्याने संध्याकाळी कामावरून घरी पतरणाऱ्या हार्बरच्या प्रवाशांचा खोळंबा झाला.
हार्बर रेल्वेमार्गावर संध्याकाळी सहा पंचावन्नच्या सुमारास वांद्रय़ाहून सीएसटीकडे येणाऱ्या लोकलचा एक डबा सीएसटी ते मस्जिद स्थानकादरम्यान घसरला. मोटरमनच्या मागे असणाऱ्या महिलांचा दुसरा डबा रुळावरून घसरल्याने ताबडतोब हार्बरची अप आणि डाउन दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. घसरलेला डबा रुळांवरून हटवण्यासाठी चार तासांपेक्षा जास्त वेळ लागल्याने हार्बर रेल्वेसेवा रात्री उशिरापर्यंत बंद होती. हार्बरच्या प्रवाशांना मध्य रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळेत झालेल्या या दुर्घटनेमुळे हार्बरच्या प्रवाशांना घर गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.

चौकशी समितीच्या अहवालानंतरच या घोळाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. सीएसटी ते वडाळा दरम्यानची रेल्वे सेवा बंद झाल्याने प्रवाशांनी घरी जाण्यासाठी बस बरोबरच रिक्षा, टॅक्सीकडे धाव घेतली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी घटनास्थळाला भेट दिली. हार्बरच्या रेल्वे रुळांवर अनेक वळणे असल्याने अपघात झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. रात्री उशिरापर्यंत ही सेवा पुर्णपणे कोलमडलेली होती.