ठाकुर्ली आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलचा डबा रुळावरून घसरल्यामुळे रविवारी सकाळी तब्बल दोन तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती करून सेवा सुरू केली. परंतु काही क्षणांत त्याच लोकलचा दुसरा डबा घसरल्याने रेल्वे कर्मचारी हैराण झाले. त्यानंतर दोन तासांनी सेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांना तब्बल चार तास मनस्ताप सहन करावा लागला.
कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या लोकलचा डबा रविवारी साडेअकराच्या सुमारास ठाकुर्ली आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावरून घसरला. या घटनेत कोणीही मृत वा जखमी झाले नाही. परंतु रेल्वे वाहतूक मात्र विस्कळीत झाली. रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दोन तास अथक प्रयत्नांनंतर घसरलेला डबा मार्गावर आणला. त्यानंतर सेवा सुरू झाली. मात्र काही क्षणांतच याच लोकलचा दुसरा डबा मार्गावरून घसरला. हा घसरलेला डबा पुन्हा मार्गावर आणण्यासाठी तब्बल दोन तास लागले. मात्र यामुळे उपनगरी गाडय़ा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.