गुरूवारी मध्यरात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसाने एकाचा बळी घेतला. मालाड येथे पावसामुळे गाडीवर झाड कोसळून पराग पावस्कर या व्यक्तीचा मृत्यू झाला.  मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. पावसामुळे शुक्रवारी रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले होते. तर रस्ते आणि हवाई मार्गावर याचा परिणाम झाला होता.  शुक्रवारी सकाळी तिन्ही मार्गावर लोकल १५ ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीची कोंडी झाली होती. अंधेरी सबवेवर पाणी साचल्याने हा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

रस्त्यावरचे खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे पश्चिम  द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूकही  धीम्या गतीने सुरु होती. सकाळी अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरही वाहतुकीला याचा फटका बसला होता. पावसामुळे  बोरिवली, जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, मरोळ, गांधी नगर, किंग्ज सर्कल, माटुंगा, दादर, परळ याभागांत देखील पाणी साचले होते.  पश्चिम, हार्बर, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. तिन्ही मार्गावर लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशीराने होती त्यामुळे सकाळी कार्यालयाकडे निघालेल्या कर्मचा-यांचा त्रास सहन करावा लागला.  सकाळी अाठच्या सुमारास नेरूळ येथे रेल्वे इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे- पनवेल वाहतुकही पूर्णपणे ठप्प झाली होती. बिघाड दुरुस्त झाल्यानंतरही काही काळ या मार्गावर लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होती. धावपट्टीवर पाणी साचल्याने विमानसेवांवरही याचा परिणाम झाला होता. रेल्वे आणि रस्ते दोन्ही वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकराचे हाल झाले होते.