शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाच्या मुसळधार सरी सोमवारीही कायम आहेत. मुंबईसह राज्यभरात तुफान पाऊस पडत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भाईंदर,पालघर-डहाणू या उपनगरांमध्येही पावसाची संततधार सुरु आहे तर, पश्चिम उपनगरांनाही पावसाने झोपडले आहे.
सोमवारचा दिवस त्यात मुसळधार पाऊस यामुळे कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे हाल होण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईच्या ‘लाईफलाईन’चे रडगाणे पुन्हा सुरू झाले आहे.
हार्बर रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशीराने सुरू आहे तर, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. अंधेरी चकाला परिसरात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.
दुसरीकडे राज्यभरात पावसाचे थैमान सुरू आहे. रायगडमधील जिल्ह्य़ातील अनेक भागांतील वीजपुरवठा अतिवृष्टीमुळे खंडित झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत एकूण सरासरी ११७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील दोपोली तालुक्यात सर्वात जास्त (१६८ मिमी) पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील नांदेड, जालना, बीड, लातूरसह अमरावतीमधील अनेक भागातही चांगला पाऊस बरसत आहे. पुण्यातही पावसाची संततधार कायम आहे. दरम्यान येत्या २४ तासात मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.