मानखुर्द-पनवेलदरम्यान १०० किमी प्रति तास वेगासाठी प्रयत्न; पावसाळय़ानंतर अमलबजावणी
हार्बर मार्गावर डीसी-एसी परिवर्तन झाल्यानंतर आता या मार्गावरील वेग वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. विविध कामे करून पावसाळ्यानंतर मानखुर्द-पनवेल यादरम्यानचा वेग ताशी ८० किलोमीटरवरून १०० किलोमीटर करण्याचा निर्धार मध्य रेल्वेने केला आहे. यासाठी नव्या गाडय़ा चालवण्यासोबतच रुळांमधील खडी बदलणे, गाडी वळते तेव्हा रुळांमधील बाकही तपासणे आदी कामेही करावी लागणार आहेत. त्यानंतर हार्बरवरील प्रवास तीन ते पाच मिनिटांनी जलद होण्याची शक्यता आहे.
हार्बर मार्गावर लवकरच ९ ऐवजी १२ डब्यांच्या गाडय़ांमार्फत ५९० सेवा चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सेवेच्या वेळेत प्रति स्थानक ३-४ सेकंदांची वाढ होईल. याचा परिणाम वेळापत्रकावर होणार असल्याने कदाचित संपूर्ण वेळापत्रक बदलण्याची वेळ मध्य रेल्वेवर येणार आहे. ते होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे आता विविध उपाय तपासून बघत आहे. त्यात गाडय़ांचा वेग वाढवण्याबाबतही चाचपणी केली जाणार आहे.
सध्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या मार्गावर ताशी ८० किमी हा रूळ वेग (ट्रॅक स्पीड) आहे. प्रचलित जुन्या बनावटीच्या गाडय़ा जेमतेम ताशी ४० ते ६० किमी वेगात धावतात. सध्या ८० किमी असलेला हा वेग मानखुर्द ते पनवेल यांदरम्यान ताशी १०० किमी करण्यासाठी रेल्वे प्रयत्न करणार असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास मानखुर्द ते पनवेल यांतील प्रत्येक स्थानकादरम्यान ३० ते ४० सेकंदांचा वेळ वाचणार आहे. म्हणजेच या टप्प्यात प्रवासाचा वेळ ३ ते ५ मिनिटांनी कमी होईल. हा वेळ हार्बर मार्गाचे वेळापत्रक नियमित राखण्यात उपयोगी पडणार आहे.
हे बदल करण्यासाठी रेल्वेला मानखुर्द ते पनवेलदरम्यान विविध कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे पावसाळ्यानंतर ही वेगवाढ शक्य होणार आहे.