मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सहा तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव सोमवारी ओसंडून वाहू लागला. तुळशी तलावाची जलपातळी १३९.१७ मीटर असून ८,०४६ दशलक्ष लिटर पाणी सामावून घेण्याची क्षमता आहे. दर दिवशी या तलावातून १५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना होतो. साधारणत: मुलुंड, भांडुप आणि पवई परिसरातील नागरिकांना तुळशी तलावातील पाणी पुरविले जाते.
मुंबईत दमदार पाऊस
मुंबईमध्ये सोमवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण आणि पावसाची रिमझिम यामुळे मुंबईत सुखद गारवा निर्माण झाला होता. सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी भरल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार, अप्पर वैतरणा, भातसा व मध्य वैतरणा क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम आहे.  
राज्यात पुन्हा जोर
पावसाने राज्याच्या बहुतांश भागात पुन्हा जोर धरला असून, कोकण, सह्य़ाद्रीचे घाटमाथे आणि मध्य महाराष्ट्रात त्याची तीव्रता अधिक होती. पुढील दोन दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील धरणांमधील साठा ३५ टक्क्य़ांवर पोहोचला आहे.
*गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बृहन्मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव सोमवारी दुपारी १२.०० वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला आहे.

गतवर्षी हा तलाव १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता, अशी माहिती महापालिकेतर्फे पुरविण्यात आली आहे. या तलावातून भांडूप, मुलूंड आणि पवई परिसराला दरदिवशी १५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो.