रूपेरी पडद्यावर एकापेक्षा एक सरस संवाद फेकत प्रेक्षकांच्या टाळ्या, शिटय़ा मिळवणाऱ्या अभिनेता सलमान खानला वादग्रस्त ट्विटमुळे रविवारी चौफेर टीकेला सामोरे जावे लागले. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनच्या शिक्षेबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच सलमानने शनिवारी रात्री ‘याकूबला फाशी देण्यापेक्षा त्याच्या भावाला टायगर मेमनला फाशी द्या’ असे वादग्रस्त ट्विट केले. या ट्विटनंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली. अखेरीस हे ट्विट मागे घेत असल्याचे सांगत सलमानने रविवारी सायंकाळी दिलगिरी व्यक्त केली.
याकूबच्या फाशीबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. या शिक्षेबाबत सलमानने शनिवारी रात्री स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवर बरीच उलटसुलट विधाने केली. ‘फाशी द्यायचीच असेल तर टायगर मेमनला द्या, त्याच्या भावाचा बळी देऊ नका’, असे सलमानने त्यात म्हटले होते. त्यानंतर ट्विटर अकाऊंटवर त्याच्यावर (पान ३ पाहा)
संबंधित टीकेचा भडिमार झाला. अनेक ठिकाणी सलमानच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले. सध्या तिकीट बारीवर गर्दी खेचणाऱ्या सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटालाही त्याचा फटका बसला. वांद्रे पोलिसांनी २० निदर्शकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. अखेरीस दिवसभराच्या वादानंतर सलमानने सगळ्यांची माफी मागत आपले ट्विट मागे घेत असल्याचे जाहीर केले.