हिंदू धर्मात विवाहबंधन पवित्र मानले जाते. त्यामुळे लग्नानंतर लैंगिक संबंधासाठी पतीकडून होणारी बळजबरी हा बलात्कार आहे असा विचार आपल्या समाजात केला जाऊ शकत नाही, असे विधान संसदेत मंत्रीमहोदयांनी केल्यानंतर ट्विटरवर ‘मॅरिटल रेप’ या विषयासंदर्भात एकूणच शासनस्तरावर असलेल्या अनास्थेबद्दल आणि अज्ञानाबद्दल टीकेची झोड उठली आहे. लग्न पवित्र म्हणून पतीकडून होणारा बलात्कारही पवित्रच, इतका साधा आणि सरळ तर्क सरकारने केला आहे इथपासून ते याच नियमाला धरून वागायचे ठरले तर धर्म पवित्र म्हणून धार्मिक हिंसाही पवित्रच म्हणायला सरकार कमी करणार नाही, अशी टीका समाजाच्या सगळ्याच स्तरातून केली जात आहे.
‘मॅरिटल रेप’ ही संकल्पना अनेक देशात अस्तित्त्वात आहे. मात्र, आपल्याकडे तथाकथित विवाहसंस्थेचा, कुटुंबसंस्थेचा आणि त्याच्या पावित्र्याचा दाखला देत ‘मॅरिटल रेप’ ही संकल्पनाच नाकारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लग्नानंतर लैंगिक संबंधांसाठी पतीने बळजबरी केली याचा पुरावा पत्नी देऊ शकत नाही. त्यामुळे मुळात ‘मॅरिटल रेप’ सिद्ध कसा करणार, या एकाच प्रश्नामुळे त्याला कायद्याच्या चौकटीत बसवणे ही अवघड समस्या होऊन बसली आहे. मात्र, त्यावर काही उपाय शोधण्यापेक्षा वैवाहिक नातेसंबंधांना पावित्र्याचे कोंदण देऊन मूळ प्रश्नच नाहीसा करण्याचा प्रयत्न सरकारी स्तरावरून केला जातो आहे, याबद्दल ट्विटरवर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. मंत्रीमहोदयांनी ‘मॅरिटल रेप’ची संकल्पनाच नाकारली आहे. मग पवित्र विवाह बंधन म्हणजे बलात्कार करण्याचाच कायदेशीर हक्क, असे समजायचे का, असा प्रश्न विचारला जात आहे. लग्न म्हणजे पत्नीच्या शरीराचा हवा तसा वापर करण्याचा दिलेला परवानाच जणू या थाटातली वागणूक आजही आपल्याकडे शहरी आणि ग्रामीण दोन्ही समाजात दिसते. आपल्याकडे अजूनही ५० ते ६० टक्के लग्नांमध्ये मुलीकडून हुंडा घेतला जातो. मग अशा विवाहांना पवित्र कसे म्हणणार? पैशासाठी केलेले विवाह हे निव्वळ व्यवहार ठरतात. अशा विवाहांना पवित्रतेचे लेबलच लावले जाऊ शकत नाही, असे ठाम मत व्यक्त केले गेले आहे.
ओनीरसारख्या दिग्दर्शकाने ही अत्यंत दु:खद गोष्ट असल्याचे म्हटले आहे. विवाहबंधन आपल्याकडे पवित्र मानले जाते म्हणून ‘मॅरिटल रेप’ हा गुन्हा ठरू शकत नाही, यासारखी वाईट गोष्ट नाही, असे ओनीरने म्हटले आहे. त्यामागे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपल्या समाजात गेली कित्येक वर्ष लग्नानंतर लैंगिक संबंधांचा एखाद्या शस्त्रासारखा करत स्त्रियांवर अन्वनित अत्याचार केले जातात. आणि तरीही ही हिंसा आपण थांबवू शकत नाही. कारण, कायद्याने त्यांना पती-पत्नी म्हणून मान्यता दिल्यानंतर पतीने बळजबरी केली तर तो बलात्कार होऊच शकत नाही.. ‘मॅरिटल रेप’ ही संकल्पना नाकारताना आपण अमुक एकप्रकारे बलात्कार झाला तर तो भयानक गुन्हा आणि अशा प्रकारे विवाहानंतर बलात्कार झाला तर तो कमी गुन्हा अशी कळत-नकळत वर्गवारी कशी करू शकतो? बलात्कार हा कुठल्याही प्रकारचा असू दे तो बलात्कारच असतो हे मान्य केले पाहिजे, असा विचार समाजाच्या सगळ्याच स्तरांतून ठामपणे व्यक्त झाला आहे.