विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील २५ वर्षीय योगेश तिवारी हा तरुण ट्विटरच्या मदतीने मायदेशी परत आल्याची घटना रविवारी घडली.
दोन आठवडय़ापूर्वी या तरुणाला चंडिगढस्थित एका दलालाने नोकरीचे अमिष दाखवून मलेशियामध्ये नेले होते. मात्र मलेशियात दाखल झाल्यावर योगेशला न सांगता दलाल फरार झाला. योगेशकडे कामाचा व्हिसाही नव्हता. स्वत:कडील दीड लाख रुपये त्याने आधीच दलालाकडे दिल्याने त्याच्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते. अनोळखी देशात तगून राहण्यासाठी त्याने मिळेल ते काम केले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योगेशने आपली अवस्था ट्विटरच्या माध्यमातून सांगितली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने परराष्ट्र विभागाशी संपर्क केल्यानंतर मलेशियातील भारतीय दूतावासाच्या साह्य़ाने योगेशला भारतात आणण्यात आले.