आता रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनाही ट्विटर अनिवार्य;
रेल्वे बोर्डाचे आदेश, केलेल्या कामाची माहिती पोहोचवा!
ट्विटरसारख्या समाजमाध्यमावरून प्रवाशांच्या थेट संपर्कात राहण्याचा अनोखा मार्ग रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मुख्यालयांतील महाव्यवस्थापक आणि विभागांतील रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह अधिकाऱ्यांना ट्विटर वापरणे रेल्वे मंत्रालयाने बंधनकारक केले असताना आता हे बंधन रेल्वे सुरक्षा दलाच्या निरीक्षक पदावरील सर्व अधिकाऱ्यांवरही घालण्यात आले आहे. ट्विटरच्या माध्यमातून प्रवाशांसाठी केलेल्या कामांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे रेल्वे बोर्डाने सुचवले आहे.
ट्विटरवरील प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अनेक समस्यांची तड लावली आहे. स्वत: रेल्वेमंत्री क्षणोक्षणी आपले अस्तित्व ट्विटरवर दाखवत असतात. त्यांच्याच आदेशांनुसार रेल्वेतील महाव्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ट्विटर वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे रेल्वेकडे दिलेल्या लेखी तक्रारीची तड लागो न लागो, ट्विटरवरील तक्रारी लगेच निकालात निघत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. त्यामुळे रेल्वेकरांच्या ‘ट्विपण्णी’चा चिवचिवाट वाढला आहे.
आतापर्यंत केवळ रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित असलेला हा ट्विटरबंध रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांसाठीही अनिवार्य करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता रेल्वे सुरक्षा दलात निरीक्षक पदापासून सर्वच अधिकाऱ्यांना ट्विटर हाताळणे अनिवार्य करण्यात आले आहे. ट्विटवर आपले खाते उघडून त्याद्वारे प्रवाशांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर लगेच कारवाई करणे आदी गोष्टी आता रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांना करायच्या आहेत.
तेवढय़ावर न थांबता कारवाईचा तपशील टाकून समस्या कशी सोडवण्यात आली, याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटून घेण्याचे कामही या अधिकाऱ्यांना करावे लागेल. परिणामी ट्विटरवरील रेल्वेचा
चिवचिवाट अधिक वाढणार आहे. या नव्या माध्यमामुळे रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व आणखी वाढेल, असा दावा करण्यात येत आहे.