हंगामी काळात रेल्वेचा दुरुस्तीचा घाट
कोकणवसियांना दिलासा देण्यासाठी बऱ्याच अडचणीनंतर नव्याने सेवेत आलेल्या वातानुकूलित डबलडेकरचे दोन डबे सध्या ‘गायब’ झाले आहेत. ऐन सुटीच्या काळात दुरुस्तीच्या कामासाठी हे डबे रेल्वेच्या कार्यशाळेत पाठवण्यात आल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ आधिकाऱ्याने सांगितले आहे.
वातानुकूलित डबलडेकर गाडी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या कार्यशाळेत पाठवण्यात आले होती. मात्र त्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानंतर पुन्हा एकदा ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा आठ डब्यांऐवजी सहा डब्यांची गाडी चालवण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर आली आहे. वातानुकूलित डबलडेकर गाडीचे दोन डबे दुरुस्तीसाठी रेल्वेच्या कार्यशाळेत पाठवण्यात आल्याचे सहा डब्यांची गाडी चालवत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
उन्हाळ्यात सुटीच्या काळात प्रवाशांकडून वातानुकूलित डबलडेकर गाडीला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी या गाडीच्या दोन डब्यांच्या दुरुस्तीचा घाट मध्य रेल्वेकडून घालण्यात आल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर या कारभारामुळे रेल्वेचेही आर्थिक नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, या प्रकरणी आपल्याला काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे डबलडेकर गाडी चालवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन फार उत्साही नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.