एलबीटी कर भरणेत तडजोड करण्यासाठी लाच घेताना शासकीय विभागाच्या दोन अधिकाऱयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
उल्हासनगर महापालिकेचे अभियंते आणि सहाय्यक महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे दिपक पांडुरंग चीमंकारे(४२) यांना तक्रारकर्ते अनिल हर्च्वानी यांच्याकडून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाटगे यांनी दिली.
एलबीटी कर भरण्याच्या बाबतीत दिपक चीमंकारे यांनी आपल्याकडे दोन लाखांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला होता. त्यानंतर ही तडजोड एक लाख रुपयांपर्यंत करण्यात आली. तक्रारकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास सहाय्यक महापालिका आयुक्त चीमंकारे यांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणात पोलीस अधिकारी परशुराम गायकवाड यांचाही समावेश असल्याचे आढळून आल्याने त्यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयाने दिली. परंतु, गायकवाड यांची या प्रकरणातील सहभागाविषयीची सविस्तर माहिती अद्याप तरी कळू शकलेली नाही.