हद्दीचा वाद मुंबई पोलिसांना भोवला असून पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत अ‍ॅन्टॉप हिल व वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी हद्दीच्या वादावरून या मुलीला उपचार मिळण्यास उशीर झाला होता.अ‍ॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यातील अधिकारी संजीव निंबाळकर तसेच वडाळा पोलीस ठाण्यातील झावरे या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वडाळा येथे एका चार वर्षांच्या मुलीला २१ एप्रिल रोजी रात्री अज्ञात इसमाने पळवून नेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास ही मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत सापडली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अ‍ॅन्टॉप हिल व वडाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. त्यावेळी मुलगी सापडली ती जागा कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, यावरून त्यांच्यात वाद झाला. परिणामी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यास व उपचार सुरू होण्यास उशीर झाला होता.