देशाच्या उत्तर भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा अप्रत्यक्ष परिणाम मुंबईसह कोकण किनारपट्टीवर होणार असून सोमवार व मंगळवारी दक्ष राहण्याच्या सूचना केंद्रीय वेधशाळेकडून देण्यात आल्या आहेत. संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिमुसळधार सरी पडतील. बंगालच्या उपसागरातही किनाऱ्यानजीक कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले आहे.
राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश व गुजरातवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवसही या भागात अतिमुसळधार पाऊस पडेल. याचाच परिणामस्वरूप कोकण किनारपट्टीवरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईसह कोकणात जोरदार वृष्टी होणार असून दक्ष राहण्याच्या सूचना वेधशाळेने दिल्या आहेत. बुधवारी पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने त्यासाठी पूरक वातावरण केले आहे. पश्चिम बंगालच्या किनाऱ्यानजीकचे हे क्षेत्र तीव्र झाले असून त्यामुळे येत्या दोन दिवसांत पश्चिम बंगालसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा पूर्व भागात मुसळधार पाऊस पडेल. या आठवडय़ात राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत पावसाचा जोर राहणार असून त्याच्या प्रभावाने विदर्भासह राज्याच्या उत्तर भागात पावसाच्या सरी येतील. पाऊस, वादळ, विजा यासंबंधी वेधशाळेकडून वेळोवेळी सूचना येतात. या सूचना चार प्रकारच्या असतात. पहिली पातळी म्हणजे नैसर्गिक घटनांचा कोणताही धोका नसल्याची सूचना. दुसरी पातळी म्हणजे सजग राहा. दक्ष राहण्याची व आपत्कालीन घटनेला तोंड देण्यास तयार राहण्याची सूचना तिसऱ्या पातळीवर असते तर चौथी सर्वोच्च पातळी ही प्रत्यक्षात कार्यवाही करण्याची सूचना देणारी असते.

जुलैमध्ये सरासरीच्या ३३ टक्केपाऊस
गेल्या आठवडय़ाभरात लागलेल्या पावसामुळे मुंबईतील जुलैची सरासरी ३३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकली आहे. २७ जुलैपर्यंत सांताक्रूझ येथे २६५ मिमी पावसाची नोंद झाली असून जुलैची सरासरी ८०० मिमी आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात पावसाने ओढ दिली होती. मात्र २१ जुलैपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. कोकणात २५ टक्के तर राज्यात ३० टक्के कमी पाऊस
पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे देशातील पावसाची सरासरी पुन्हा एकदा ९५ टक्क्यांवर गेली आहे. उत्तर भागात बिहार व उत्तर प्रदेशच्या पूर्वेचा भाग वगळता इतरत्र सरासरीएवढा व त्याहून अधिक पाऊस पडला आहे. दक्षिणेत मात्र महाराष्ट्रासह कर्नाटकचा पश्चिम भाग व केरळ या राज्यांवर मान्सूनची अवकृपा आहे. त्यातही महाराष्ट्रात या वेळी पावसाने सर्वात कमी उपस्थिती लावली. गेला आठवडाभर ठाणे रायगड येथे पावसाची सुरुवात झाली असली तरी कोकणात सरासरीहून २५ टक्के कमी पाऊस पडला आहे तर राज्यातील तूट ३० टक्के आहे.