पाकिस्तानी संकेतस्थळांवरून, (अप) प्रचारकी बातम्या

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने लक्ष्यभेदी कारवाई (सर्जिकल स्ट्राइक्स) केल्याच्या बातम्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच नाहीत.. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत पाकिस्तानातील प्रमुख इंग्रजी दैनिके आणि ‘जिओ टीव्ही’सारख्या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळांवर याच घडामोडींसंदर्भात, परंतु अगदी निराळय़ा बातम्या दिल्या जात होत्या. चंदू बाबूलाल चौहान या २२ वर्षांच्या एका जवानाला पाकिस्तानी फौजांनी बंदी बनवल्याची बातमीच अनेक संकेतस्थळांवरून ठळकपणे दिली जात होती.

‘द डॉन’ या इंग्रजी दैनिकाने मिळवलेल्या माहितीनुसार, चंदू बाबूलाल चौहान हा महाराष्ट्रातील असून त्यांच्या वडिलांचे नाव ‘बशन चौहान’ असे आहे. या माहितीला भारताने दुजोरा दिलेला नाहीच; परंतु ‘चौहान’बद्दल ही उलटसुलट माहिती पाकिस्तानातील कोणत्या स्रोताकडून ‘द डॉन’ला मिळाली, याचाही उल्लेख मुजफ्फराबादहून अब्रार हैदर यांनी दिलेल्या या वृत्तात नाही.

भारताकडून लक्ष्यभेदी कारवाई झाल्याचा ठाम इन्कार पाकिस्तानी लष्कराच्या अधिकृत प्रचारसेवेने केल्यामुळे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांची पंचाईत झाली आणि जखमांवर प्रचारकी बातम्यांचे मलम लावण्याचे प्रयोग सुरू झाले. त्यामुळे प्रत्येक वाहिनी वा वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने जमेल तितकी भारतविरोधी माहिती ‘अपलोड’ करणे आरंभले. ‘द डॉन’ने मुजफ्फराबादहून आठ भारतीय जवानांना मारल्याची बातमी दिली, पण याच पत्राच्या इस्लामाबादहून आलेल्या बातमीत दोन भारतीय जवान ठार झाल्याचे म्हटले आहे. ‘द नेशन’ या दैनिकाच्या संकेतस्थळाने शहीद झालेल्या भारतीय जवानांचा आकडा पाच असा सांगितला आहे.

सुसंगती नसलेल्या या बातम्यांतून विश्वासार्ह माहिती अजिबात मिळत नाही. परंतु अन्य बातम्यांतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते : पाकिस्तानचे धाबे दणाणले असून हा देश आता कुरापतखोरीचा अन्य मार्ग शोधतो आहे. शुक्रवारी, पाकिस्तानातील सुट्टीच्या दिवशीही पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बोलावलेल्या बैठकांचे वृत्त आणि  ‘पाकिस्तानने कृतिशील व्हायला हवे- संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे’ असे संकलन ‘द नेशन’ने अग्रभागी ठेवले आहे. तर ‘द (पाकिस्तान) ट्रिब्यून’च्या संकेतस्थळाने ‘सर्जिकल स्ट्राइक’ झाला नसल्याचे आणि दोघे भारतीय सैनिक ठार केल्याचे वृत्त देऊन झाल्यावर, ‘भारत आणि पाकिस्तानचे शेअरबाजार गडगडले’ याकडे लक्ष वेधले आहे. नवाझ शरीफ आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख यांच्यात चर्चा झाली, असा मथळा देऊन त्याखालच्या बातमीत ही चर्चा दूरध्वनीवरून झाली एवढीच नवी माहिती दिली आहे!  ही बातमी अशी असली तरी, ती संकेतस्थळावर ठळकपणेच दिसेल, अशी तजवीज ‘जिओ टीव्ही’ने केली आहे.

हमीद मीर हे ‘जिओ टीव्ही’चे संपादक आणि पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांवरील ‘जाना-माना’ चेहरा. त्यांच्या एका ट्विप्पणीत ‘भारतीय जवानांचे मृतदेह नियंत्रण रेषेजवळच पडलेले आहेत.. आमच्याकडे व्हीडिओफीत आहे’ असा उल्लेख होता. मात्र ही व्हीडिओफीत ‘जिओ टीव्ही’च्या संकेतस्थळावर रात्रीपर्यंत नव्हती.