सट्टय़ामध्ये झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी एका सिनेतंत्रज्ञाकडे ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. महसूल गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त महासंचालक आणि आयकर विभाग आयुक्त असल्याची बतावणी करत या व्यक्तीने संपूर्ण कट स्वतच रचला. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात पैशांचा पहिला हप्ता घेण्यासाठी सोबत मित्राला नेल्याने मित्रही पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
हिंदी सिनेसृष्टीत सेट लावणारा कलादिग्दर्शक महेशला (नाव बदलले आहे)५ मे रोजी फोन आला. मात्र, कामाच्या गडबडीत त्याने तो घेतला नाही, मात्र, त्याच क्रमांकावरुन तंत्रज्ञाला लघुसंदेश आला. यात मी आयकर आयुक्त अनिल कुमार असून माझ्या काही मित्रांना चित्रपटांचे चित्रिकरण पाहायचे आहे, असे समोरून सांगण्यात आले. महेशने विनंती मान्य करत त्याच्या कार्यालयातील व्यक्तीला या मित्रांना चित्रीकरण पाहायला दिले. २३ मे रोजी महेशला एका वेगळ्याच क्रमांकावरुन संदेश आला, यात तुमच्यावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाचा छापा पडणार असून तुम्ही काळजी घ्या, असे लिहीले होते. महेशने त्या क्रमांकावर संपर्क साधला असता, मी संचालनालयाचे आयुक्त अजित कुमार यांना ओळखतो, तुम्ही काहीही काळजी करु नका, असे सांगितले आणि एक क्रमांक देत संचालनालयाचे आयुक्त अजित कुमार यांचा हा क्रमांक असल्याचे सांगितले. त्यानंतर महेशला अक्षय नावाच्या व्यक्तीने फोन करुन छापा रद्द करण्यासाठी ५० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. महेशने गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे याची तक्रार केली. २.५ लाखांचा पहिला घेण्यासाठी आलेल्या मुरली मुंधारा (३६) याच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली.