नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना फूस लावून पळवून नेण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.
या १५ वर्षांच्या विद्यार्थिनी अंधेरीतील आदर्शनगर येथे राहतात. तेथील रामजाने यादव (२०) आणि अव्वल शेख ऊर्फ साईनाथ (१९) या तरुणांनी शिकवणीला जाणाऱ्या या मुलींना रस्त्यात गाठून त्यांच्याशी ओळख केली आणि नंतर प्रेमजाळ्यात ओढले. शनिवारी संध्याकाळी त्यांना वालावलकर उद्यानाजवळ भेटायला बोलावले आणि नंतर फूस लावून अर्नाळा येथे फिरायला नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला.
दरम्यान, सुनीता आणि शीला घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याच परिसरातले रामजाने आणि अव्वल शेखही बेपत्ता असल्याने त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला. ते दोघे नालासोपारा येथे असल्याची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष वेळे यांच्या पथकाने सापळा लावून त्या दोघांना अटक केली.