उद्या उडिपीमध्ये प्रयोग; हिंदी, गुजराथी, सिंधी, कोकणीतही अनुवाद

आनंद म्हसवेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘यू टर्न’ या मराठी नाटकाच्या कन्नड भाषेतील अनुवादाचे प्रकाशन आणि कन्नड भाषेतील प्रयोग उद्या १ ऑगस्ट रोजी उडीपी येथील मनिताल विद्यापीठाच्या गंगुबाई हनगल सभागृहात होणार आहे. या नाटकाचा हिंदी, गुजराथी, सिंधी व कोकणी भाषेतही अनुवाद झाला असून त्या भाषेत प्रयोगही सादर झाले आहेत.

कन्नड  भाषेतील अनुवाद डॉ. नीता इनामदार व सविता शास्त्री यांनी केला आहे. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एच. विनोद भट आणि लेखक आनंद म्हसवेकर उपस्थित राहणार आहेत. पुस्तक प्रकाशनानंतर नाटकाचा कन्नड भाषेतील प्रयोग सादर होणार आहे.  नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध कन्नड अभिनेते व दिग्दर्शक प्रदीपचंद्र कुटपडी यांनी केले आहे. नाटकातही त्यांच्यासह रेवती नडगीर यांची प्रमुख भूमिका आहे.

‘यू टर्न’ या मराठी नाटकाचा पहिला प्रयोग १७ डिसेंबर २००८ मध्ये झाला. आत्तापर्यंत नाटकाचे ५८५ प्रयोग झाले आहेत. या नाटकात डॉ. गिरीश ओक व इला भाटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटक  अवघ्या दोन पात्रांचे असून ‘यु टर्न’मुळे रंगभूमवीर मोजक्या पात्रांना घेऊन नाटक सादर करण्याचा कल पुन्हा एकदा सुरु झाला.

उतारवयातील सोबतीची गरज(कम्पॅनियनशिप) हा या नाटकाचा   विषय आहे. नाटकाचा नायक हा साठ वर्षे वयाचा असून निवृत्त आहे आणि त्याची बायको त्याला सोडून गेली आहे. तर नायिका ही त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असून ती विधवा आहे. या दोन पात्रांना केंद्रस्थानी ठेवून हे नाटक पुढे सरकते.

उतारवयातील सोबत हा विषय भाषिक बंधनाच्या पलिकडे जाणारा आहे. त्यामुळेच मराठीसह अन्य भाषांमध्येही या नाटकाचा अनुवाद आणि प्रयोग झाले तसेच चांगला प्रतिसाद मिळाला. एका योगायोगाची गंमत वाटते. ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पुष्पात ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमास मी उपस्थित होतो. भैरप्पा यांच्या सर्वच कादंबऱ्याचे मराठीत अनुवाद झाले आहेत. आता मी लिहिलेल्या नाटकाचा कन्नड भाषेत अनुवाद होतोय, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

 –आनंद म्हसवेकर. यु टर्नचे लेखक आणि दिग्दर्शक