काळ्या-पिवळ्या टॅक्सी-रिक्षाचालकांसाठी उबरची योजना ; सुरक्षित आणि स्थिर उत्पन्नाचा पर्याय

ओला-उबर अशा खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांना आळा घालण्यासाठी उत्सुक असलेल्या रिक्षा-टॅक्सीचालकांनाच आता आपल्या कळपात सामावून घेण्याची योजना उबर कंपनीने आखली आहे. या योजनेचे नाव ‘मीपण मालक’ असे असून या योजनेद्वारे रिक्षा-टॅक्सीचालकांना आमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे या योजनेमुळे रिक्षा-टॅक्सीचालकांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांना स्थिर उत्पन्नाचा मार्ग मिळेल, असे कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे.

काळ्या-पिवळ्या रिक्षा-टॅक्सीचालकांनी ओला-उबर अशा कंपन्यांविरोधात कोणत्याही संघटनेचा झेंडा हाती घेण्याची तयारी केली आहे. मात्र उबरने संघर्षांचा मार्ग न अवलंबता या रिक्षा-टॅक्सीचालकांना थेट आपल्या पंखांखाली घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी ‘मीपण मालक’ ही योजना आखण्यात आली असून या योजनेद्वारे कंपनीने या चालकांना प्रमुख वित्तीय संस्थांप्रमाणे कार उत्पादकांसह भागीदारीची संधी दिली आहे.

टॅक्सीप्रमाणे रिक्षाचालकांनाही कमीत कमी गुंतवणूक करत या योजनेत सहभागी होता येईल, असे उबर कंपनीचे महाव्यवस्थापक शैलेश सालवानी यांनी स्पष्ट केले. या योजनेत चालक सहभागी झाले, तर उबरच्या ताफ्यात आता परवानाधारक चालकही दाखल होतील.