बेस्टच्याच थांब्यांवर उबरच्या जाहिराती

टाटा कंपनीच्या एखाद्या दुकानात बिर्ला कंपनीच्या एखाद्या उत्पादनाची जाहिरात बघितली आहेत का? सॅमसंगच्या गॅलरीमध्ये अ‍ॅपलची जाहिरात दिसते का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कोणत्याही सामान्य बुद्धीचा माणूस नकारार्थीच देईल. पण आपल्याच स्पर्धकाला आपल्याच अंगणातील जागा जाहिरातींसाठी देण्याचे ‘औदार्य’ बेस्ट प्रशासनाने केला आहे. सध्या दक्षिण मुंबईतील बेस्टच्या काही थांब्यांवर ‘या थांब्यावरून उबरची पूल राईड केवळ ४० रुपयांत’ अशी जाहिरात दिमाखात झळकत आहे. अनेक प्रवासी या जाहिरातींनी प्रभावित होऊन बसची रांग सोडून उबरकडे वळायला लागले असून त्यामुळे बेस्टच्या आधीच खालावलेल्या प्रवासी संख्येला आणखी गळती लागण्याची चिन्हे आहेत.

परिवहन विभागाचा उदासीन कारभार, शहरातील वाहतूक कोंडी आणि खासगी वाहने यांमुळे ४२ लाखांवरून २८ ते ३० लाख प्रवासी प्रतिदिन एवढी घसरण झालेल्या बेस्ट प्रशासनासमोर उबर आणि ओला अशा खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांचे आव्हानही उभे राहिले आहे. एकीकडे या कंपन्या विविध योजनांद्वारे प्रवाशांना आकृष्ट करत असताना दुसऱ्या बाजूला बेस्टचे काही मार्ग बंद करण्याची नामुष्की बेस्टवर ओढवली आहे. त्यातच आता बेस्टच्या हक्काच्या जागेत आपली जाहिरात लावत उबरने थेट बेस्टच्या प्रवाशांना आपल्याकडे ओढण्याची रणनीती आखली आहे. बेस्टच्या चर्चगेट स्थानक, सम्राट हॉटेल आदी थांब्यांवर सध्या उबरच्या जाहिराती झळकत आहेत. या जाहिरातींमध्ये ‘रुपीज ४० फॉर ऑल उबर पूल राईड्स फ्रॉम हिअर’ असे म्हटले असून त्याखाली अधिक माहिती घेण्यासाठी उबरच्या संकेतस्थळाचा पत्ता दर्शवण्यात आला आहे. हे दर फक्त सोमवार ते शनिवार या सहा दिवसांसाठीच लागू असतील, असेही त्यात म्हटले आहे. ही जाहिरात बेस्टच्या प्रवाशांना आकृष्ट करत असून काहींनी गर्दीतून धक्के खाण्याऐवजी ४० रुपयांत उबर टॅक्सीने जाण्यास सुरुवात केली आहे.याबाबत बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, स्पर्धेत उतरण्याशिवाय बेस्टसमोर दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट केले.

हक्क कंत्राटदाराकडे!

बेस्टच्या थांब्यांवरील जाहिरातींचे हक्क कंत्राटदाराच्या स्वाधीन असून हा कंत्राटदार बेस्टला ठरावीक रक्कम देत असतो. कंत्राटदाराला समाजविघातक जाहिराती सोडून कोणत्याही जाहिरातींसाठी हे थांबे देण्याचे स्वातंत्र्य असते. पण या जाहिराती बेस्टच्याच मुळावर उठत असतील, तर त्या रोखण्यासाठीची कोणतीही तरतूद बेस्टच्या करारात नाही.

जाहिरातीतून मिळणाऱ्या तात्पुरत्या उत्पन्नासाठी बेस्ट आपले अमूल्य प्रवासी गमावत असेल, तर हे धोकादायक आहे. कंत्राटदारासह करार करताना बेस्टने त्यात संबंधित जाहिरात बेस्ट उपक्रमाच्या हितसंबंधांना बाधा आणणारी नसावी, असा मुद्दा टाकणे आवश्यक आहे. तसे होत नसल्याने हा सर्व प्रकार बेस्ट उपक्रमाला खड्डय़ात घालणारा आहे.

ॅड. संदेश कोंडविलकर, बेस्ट समिती सदस्य (काँग्रेस)