शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्राबाबत सुरू असलेल्या वादाला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याच्या हेतूने दाव्यावरील सुनावणी ‘इन-कॅमेरा’ घेण्याची मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे. न्यायालय त्यांच्या या मागणीवर येत्या १० नोव्हेंबर रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे.
मृत्युपत्र करताना बाळासाहेबांची मन:स्थिती ठीक नव्हती, असा आरोप करीत जयदेव ठाकरे यांनी  उद्धव ठाकरे यांनी मृत्युपत्राबाबत दाखल केलेल्या ‘प्रोबेट’ला आव्हान दिले असून, बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावरील चार आक्षेपांवर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस निश्चित केले होते.
न्या. गौतम पटेल यांच्यासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने बाळासाहेबांच्या मृत्युपत्राची मूळ प्रत न्यायालयाच्या ताब्यात घेतली. या वेळेस उद्धव यांच्याकडून सादर करण्यात आलेल्यापैकी २३, तर जयदेव यांच्याकडून सादर करण्यात आलेल्यांपैकी ७७ कागदपत्रे न्यायालयाने चार आक्षेपांवरील सुनावणीसाठी दाखल करून घेतली.

बाळासाहेबांचे मृत्युपत्र १३ डिसेंबर २०११ रोजी करण्यात आले. ते कार्यान्वित आणि साक्षांकित करण्यात आलेले आहे की नाही, मृत्युपत्र करताना बाळासाहेबांची मन:स्थिती ठीक होती की नाही, असे दोन प्रमुख मुद्दे न्यायालयाने  निश्चित केले आहेत. उद्धव यांना सर्व मालमत्ता हडप करायची असल्यानेच फसवणुकीद्वारे त्यांनी बाळासाहेबांचे मृत्युपत्र तयार केल्याचे सिद्ध झाले, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही जयदेव यांनी केली आहे. उद्धव यांनी मृत्युपत्राबाबत फसवणूक केली आहे की नाही, बाळासाहेबांवर त्यांनी दबाव टाकून हे मृत्युपत्र तयार करून घेतले की नाही, यावरही दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे. तर मृत्युपत्राबाबत ‘प्रोबेट’ करण्याचा अधिकार उद्धव यांना आहे की नाही हा मुद्दा न्यायालयाने मालमत्तेचा वाद निकाली काढण्यासाठी निश्चित केला आहे.