शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार आणि ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या नावाने दादर येथे उभारण्यात आलेल्या विस्तीर्ण कला केंद्र उद्यानाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमास अनुपस्थित राहणार असल्याचे समजते. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेना सामील होऊनही महाजन यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या नावे असलेल्या उद्यानाच्या उद्घाटनाबाबत ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप नेत्यांमध्येही अस्वस्थता आहे.
महापालिकेत शिवसेना-भाजपमध्ये असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचा फटका बसल्याने गेले काही महिने या उद्यानाचे उद्घाटन आणि उद्यान विभागाकडे हस्तांतरण रखडले होते. ‘लोकसत्ता’ने त्यावर प्रकाश टाकताच भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या व दोन आठवडय़ांत पालिकेने उद्घाटन न केल्यास भाजपकडून ते केले जाईल, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी दिला होता. त्यामुळे महापालिकेने तातडीने उद्घाटनाचा निर्णय घेतला. प्रमोद महाजन हे युतीचे शिल्पकार असल्याने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे दीर्घकाळ स्नेहसंबंध राहिल्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले जाईल, असे शिवसेनेचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनीही सांगितले होते. पण ठाकरे व्यस्त असल्याने ते या समारंभास उपस्थित राहणार नाहीत. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई व महापौर स्नेहल आंबेकर हे नेते मात्र उपस्थित राहणार आहेत. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे चिरंजीव डॉ. स्वप्नेश सावंत यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनास ठाकरे हे विलेपार्लेमध्ये सकाळी १०.३० ते ११च्या सुमारास जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस त्याही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री दादर येथील समारंभ आटोपून तेथे जाणार असून ठाकरे मात्र दादरला न येता केवळ विलेपार्ले येथील समारंभास जाणार आहेत.