‘सामना’तील वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल रोखठोक भूमिकेनंतर नरमाई; विधिमंडळ अधिवेशनासाठी आग्रह

मराठा मोर्चाबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातून वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर शनिवारी जाहीर माफी मागितली आणि या वादावर पडदा टाकला. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा किंवा माता-भगिनींचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आणि ‘सामना’चा संपादक म्हणून मी माफी मागत असल्याचे ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मराठा समाजाला आरक्षण कधी देणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी करीत ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही ‘लक्ष्य’ केले आणि आरक्षण व अन्य मागण्यांबाबत विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलाविण्यात यावे, असे स्पष्ट केले.

शिवसेना कोणासमोर झुकणारा पक्ष नाही किंवा कोणाच्याही दबावामुळे मी माफी मागत नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. या व्यंगचित्रावरून वाद निर्माण झाल्यावर शिवसेना खासदार, आमदार व नेत्यांमध्येही तीव्र असंतोष निर्माण झाला होता आणि काहींनी राजीनामासत्र सुरू केले होते. ते वादळ शमविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही शिवसेनेवर भाजपसह विरोधी पक्षांचे हल्ले सुरू राहिले आणि मराठा समाजाच्या संघटनांकडूनही तीव्र विरोध व नापसंती व्यक्त होत होती. त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची भीती होती. तरीही ‘व्यंगचित्रकारांनी मागितलेली माफी पुरेशी आहे,’ अशी ‘रोखठोक’ भूमिका घेत कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. तरीही ठाकरे यांनी नरमाईची भूमिका घेत जाहीर माफी मागून व्यंगचित्रावरील वादावर पडदा टाकला आहे.

या व्यंगचित्रावरून शिवसेनेविरोधात सुरू झालेला अपप्रचार माझ्या जिव्हारी लागला. या माध्यमातून शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न झाला. पण सामान्य जनतेच्या मनात असलेल्या विश्वासाच्या बळावर आम्ही या संकटावर मात केली आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

विखे-पाटील यांचे टीकास्त्र

ठाकरे यांची माफी म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असून त्यांच्या माफीनाम्यातही संकुचितपणा दिसून येतो, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोडले.

 

आधी देश, मग सारे काही!

राज ठाकरे यांनी सलमान खानला सुनावले

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिध्द चित्रपट अभिनेता सलमान खानवर पाकिस्तानी कलावंतांबाबतच्या भूमिकेवरुन हल्लाबोल केला असून त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. ‘पाकिस्तानी कलावंत हे अतिरेकी नसले तरी खबरे नसतील, कशावरुन, असा सवाल करीत ठाकरे यांनी ‘आधी देश, मग सारे काही,’ असे खडे बोल सलमानला सुनावले आहेत.

पाकिस्तानी कलावंत हे काही दहशतवादी नाहीत, असे वक्तव्य सलमान खानने शुक्रवारी केले होते. त्यावर राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. पाकिस्तानी कलावंत काय आकाशातून पडले आहेत, का ? आपल्या देशात चांगले कलाकार मिळत नाहीत? असे सवाल उपस्थित करुन भारतीय निर्मातेही अधिक दोषी आहेत, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. सलमानला जर पाकिस्तानी कलावंताचा इतका पुळका असेल तर त्याने पाकिस्तानमध्ये जाऊन चित्रीकरण करावे, असा खोचक सल्ला ठाकरे यांनी दिला. पाकिस्तान कधीही सुधारणार नाही, धोनीवरील चित्रपटावर तेथे बंदी घालण्यात आली. सलमानसारख्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकल्याशिवाय हे सुधारणार नाहीत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. लष्करी कारवाईबाबत सलमानसारख्यांनी सल्ले देण्याची गरज नाही. सीमेवरील जवानांनी शस्त्र खाली ठेवले, तर सलमान सीमेवर जाणार आहे का, असा सवालही त्यांनी केला.